🌟परभणीकरांना उद्या बुधवार दि.07 फेब्रुवारी रोजी ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाची मेजवानी....!


🌟शहरातील विष्णु जिनींग मिल येथे दि.07 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन🌟 

परभणी (दि.06 फेब्रुवारी) : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ निमित्त राज्यात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून परभणी येथील विष्णु जिनींग मिल येथे 7 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान-प्रदान, स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत प्रभावी रितीने पोहोचावी, हा या महासंस्कृती कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. परभणी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. 7 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाच दिवसीय भव्य अशा महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मंत्री- क्रीडा व युवक कल्याण, बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते बुधवार दि. 07 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे.  

महोत्सवाच्यास पहिल्या दिवशी अशोक हांडे आणि 160 प्रथितयश कलावंतांचा सहभाग असलेला कार्यक्रम ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाची मेजवानी परभणीकरांना मिळणार आहे. देश-विदेशात 2 हजाराहून अधिक प्रयोग सादर झालेला ‘मराठी बाणा’ मराठवाड्यात परभणी येथे प्रथमच सादर होणार असून जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या