🌟भूपाळीलाच पत्रकार अनुप महाजन यांच्या आयुष्याची भैरवी 😪
भावपूर्ण शब्दांजली..✍️राजेंद्र काळे
श्री गणेश जयंती आज, चिखलीतील जुन्या गावात श्री गणपती संस्थान मध्ये परंपरेप्रमाणे गणेश जयंती सोहळा अध्यात्मिक उत्साहात सुरू होता. पहाटे मंदिरात भूपाळीचे सूर उगवत्या सूर्याला साद घालत असताना जवळच राहणारे गणेशभक्त पत्रकार अनुप महाजन यांच्या आयुष्यात जणू भैरवीचे आर्तस्वर उमटले व एक सूर्यास्त झाला. याच मंदिर परिसरात आयोजित कीर्तनात रात्री ११ वाजता जेव्हा अनुप महाजन यांनी आभार प्रदर्शन केले, तेव्हा हे आभार त्यांच्यासाठी जगाचे आभार मानणारे ठरतील.. हे कोणाच्याही लक्षात आले नसेल. वर्षभरात जे गणेशभक्त अनंतात विलीन झालेत, त्यांची आठवण करून शेवटी त्यांच्या स्मृतीला अनुप महाजन यांनी वाहिली.. भावपूर्ण श्रद्धांजली!
भावपूर्ण श्रद्धांजली, हे अनुप महाजन यांचे शेवटचे जाहीर शब्द. रात्री त्यांच्या तोंडातून आलेली 'भावपूर्ण श्रद्धांजली' सकाळी त्यांनाच अर्पण करावी लागेल, असा विचार झोपेत कोणाच्या स्वप्नातही आला नसेल. मंदिर परिसरात रात्रभर महाप्रसादासाठी जेवण बनवणे सुरू होते, सकाळी शोभायात्रा होती. पण याच गणेश जयंतीच्या पहाटे एका गणेश भक्ताच्या आयुष्याचे विसर्जन व्हावे व त्या सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा निघावी, हे दैव की दैवदुर्विलास? नियतीलाच माहीत !
अनुप महाजन, चिखली शहरातला तिसरा डोळा. काल सोमवारी म्हणजे १२ फेब्रुवारीला अनुप महाजन यांनी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या उपोषण मंडपात त्यांच्या पत्रकारितेचा प्रवास उपस्थित पत्रकारांनी पुढे उलगडवला. त्यांना जाण्याची चाहूलतर लागली नसेल ना ? तसं त्यांच्या छातीत कालच दुखलं होतं, पण त्यांनी ते दुखणं ऍसिडिटीवर नेऊन २ गोळ्यात निपटवलं. शंका तरी कशी येणार ? कोणतेही व्यसन किंवा खाण्या-पिण्यात नसलेला हा शुद्ध शाकाहारी माणूस, तेही पत्रकारितेत असताना ! ना शुगर- ना बीपी, एकदम टकाटक.. मध्येच फक्त काय ते गुडघ्याचे दुखणे व त्या आरामामुळे थोडं वजन वाढलेलं. नाहीतर कायम फिरतीवरचा हा माणूस. काल दिवसभर फिरतच होता, रात्री साडे११ ला घरी गेला अन् सकाळी ६ वाजता....
अनुप महाजन, १९८५-८६ च्या काळात चिखलीत तेव्हा डांगेअण्णा व प्रकाश मेहत्रे या २ पत्रकारानंतरचे तिसरे पत्रकार. हंटर, दिशा अशा साप्ताहिकाच्या माध्यमातून पत्रकारितेत आलेले. १९९१ ला ते 'दैनिक' असणाऱ्या 'मतदार'चे चिखली तालुका प्रतिनिधी बनले. त्याच 'मतदार'चा १९९२ ला मी त्याच तालुक्यातील शेलसूर गावाचा वार्ताहर झालो, तेव्हापासून जुळले त्यांच्याशी पत्रबंध. पुढे जनवाद, नागपूर पत्रिका, त्यांच्या बंधुचा लोकशाही वार्ता व मातृभूमी अशा विविध वृत्तपत्रात काम करताना त्यांनी 'गर्भित इशारा' हे साप्ताहिकही काढले होते. आर्यनंदी पतसंस्थेचे कार्यकारी संचालक, भाजपा सहकार आघाडीचे पदाधिकारी.. अशा विविध पातळीवर काम करत असताना बुलढाणा जिल्हा पत्रकार भवन निर्मितीतही बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचा मोठा हातभार राहिला आहे, तेव्हा विश्वंभर वाघमारे अध्यक्ष व समाधान सावळे सरचिटणीस होते.
चिखली शहराला सामाजिक व सांस्कृतिक आयाम देणारी पत्रकारितेत जी नावं आहेत, त्यातील एक अनुप महाजन. गिरीश दुबेही त्यातलेच एक होते, आता ही जय-विरुची जोडी नाही. एवढा अनुभव असतानाही अनुप महाजन नवोदितांना कायम प्रेरणा द्यायचे, माझी अन् त्यांची चिखलीत अनेकदा आर्यनंदीमध्ये भेट व्हायची.. म्हणजे मी आलो की सुरेशआप्पा त्यांना बोलावून घ्यायचे. जिल्ह्याच्या राजकारणावर गप्पा रंगायच्या, त्यात चिखलीचे राजकारण केंद्रस्थानी असायचे. एक चालता-बोलता इतिहास होते अनुप महाजन, ते इतक्या लवकर इतिहासात जातील, असं कोणाला वाटणंही शक्य नव्हतं.. पण ते झालं. त्यांचा परिवार, २ मुलं अन् चिखलीची पत्रकरिता पोरकी झाली. अनुप महाजन नावाचा एक 'वर्तमान' जरी 'भूतकाळ' बनलेलं असलंतरी 'भविष्य' काळातही त्यांनी केलेली पत्रकारिता दिशा दाखवणारी राहणार आहे, एवढे मात्र निश्चित !
लिहावं वाटत नाही, पण 'स्व.' अनुप महाजन या नावामध्ये लावताना, 'भावपूर्ण श्रद्धांजली' शब्दांजलीतून वाहताना.. शेवटी कायतर, नि:शब्द !!
✍️ राजेंद्र काळे
0 टिप्पण्या