🌟या कायद्याची अंमलबजावणी केल्यास तीव्र पडसाद उमटण्याचा प्रशासनास दिला इशारा🌟
🌟शिख समुदायाची रस्त्यावरील आंदोलनांसह न्यायालयीन लढाईची देखील तयारी🌟
नांदेड (दि.०७ फेब्रुवारी)- महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने काल सोमवार दि.०६ फेब्रुवारी २०२४ रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये सेवानिवृत्त न्यायमूर्ती भाटिया यांच्या अहवालास मंजुरी देत सचखंड गुरुद्वारा अधिनियम-२०२४ संमत केला असून या अधिनियमास नांदेड सचखंड गुरुद्वारातील पंचप्यारें यांच्यासह संपूर्ण हजुरी शिख समाजाने तीव्र विरोध केला असून या कायद्याची अंमलबजावणी केल्यास तीव्र पडसाद उमटण्याचा इशारा देखील प्रशासनाला दिला आहे.
शिख धर्मीयांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांच्या पवित्र चरणकमलांनी पावन झालेले पवित्र स्थान व जागतिक किर्तीचे सर्वोच्च धार्मिक स्थळ सचखंड गुरुद्वारा शिख धर्मीयांची दक्षिण काशी मानली जाते. या गुरुद्वाराचे व्यवस्थापन करणारा गुरुद्वारा बोर्ड ॲक्ट १९५६ रद्द करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोमवार दि.०५ फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायमूर्ती भाटिया यांच्या शिफारशीनुसार अधिनियमात बदल करून सचखंड गुरुद्वारा अधिनियम २०२४ संमत करण्यात आला आहे. गुरुद्वारा बोर्ड १९५६ मध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात येऊ नयेत याबाबत पंचप्यारे साहिब यांनी गुरुमत्ता (ठराव) दिनांक २१ जानेवारी २०१९ व १३ डिसेंबर २०२३ रोजी पास करून शासनास पाठविण्यात आला होता. असे असताना देखील राज्य शासनाने गुरुद्वारा बोर्ड ॲक्टमध्ये बदल करून सचखंड गुरुद्वारा आपल्या ताब्यात घेण्याचा घाट घातल्याचा आरोप बोर्डाचे आजी-माजी सदस्य, अध्यक्ष व हजुरी शिख समाजातर्फे करण्यात आला आहे.
हजुरी शिख समाजातर्फे दि.०७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुरुद्वारा बावली साहेब येथे घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये नव्याने येत असलेल्या गुरुद्वारा अधिनियम २०२४ चा तीव्र निषेध करून या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील असा इशारा गुरुद्वारा बोर्ड अधिक्षक ठाणसिंग बुंगई यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष शेरसिंग फौजी, माजी सचिव रवींद्रसिंग बुंगई,सदस्य राजेंद्रसिंग पुजारी,मनप्रितसिंग कुंजीवाले, गुरमितसिंग महाजन जर्नलसिंघ गाडीवाले, सरदार मनबीरसिंघ ग्रंथी,जगदीपसिंग नंबरदार, महेंद्रसिंग पैदल, तेजासिंह बावरी, हरभजनसिंग दिगवा, गुरमीतसिंग बेदी, किरपालसिंग हजुरिया, मनप्रितसिंग कारागिर, दीपकसिंग गल्लीवाले, गुरमीतसिंग बेदी, जसबीरसिंग धुपिया, जसपालसिंग लांगरी, रवींद्रसिंग मोदी, रवींद्रसिंग पुजारी, दिलीपसिंग रागी , भोला सिंग गाडीवाले अमरजीतसिंग पंजाबसिंग गिल, दीपसिंग , पुरणसिंग, राजेंद्रसिंग शाहू,हरभजन सिंग पुजारी गुरुदेवसिंग रामगडिया गुरमीतसिंग महाजन, महेंद्रसिंग लांगरी, गुरुप्रीतसिंग सोखी, अवतारसिंग पहरेदार यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
🌟राज्य सरकारच्या नवीन सचखंड गुरुद्वारा अधिनियम २०२४ शिख समाजाचा संतप्त विरोध :-
गुरुद्वारा बोर्ड १९५६ रद्द करून नवीन सचखंड गुरुद्वारा अधिनियम २०२४ मध्ये राज्य शासनातर्फे १२ नियुक्त सदस्य,०३ लोकनियुक्त तर ०२ सदस्य हे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी अमृतसरचे असतील. यामध्ये मुंबई,ठाणे,नवी मुंबई,पुणे,,नागपूर व नाशिकच्या सदस्यांचा समावेश असेल यास हजुरी शिख समाजातर्फे विरोध करण्यात येत आहे.
🌟सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही राजकीय नेत्यांचा यापुढे सन्मान नाही :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संमत करण्यात आलेला गुरुद्वारा अधिनियम 2024 चा निषेध करण्यात येत असून हजुरी शिख समाजाकडून गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही राजकीय नेत्यांचे स्वागत व सत्कार पारंपारिक शिरोपाव देवून करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.....
0 टिप्पण्या