🌟परभणी जिल्ह्यातील स्थलांतरित उसतोड कामगारांच्या मुला-मुलीसाठी वसतिगृहात मोफत प्रवेश....!


🌟संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनाअंतर्गत मिळणार मोफत प्रवेश🌟

परभणी (दि.06 फेब्रुवारी) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील उपेक्षित घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या भूमिकेतून शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. दरवर्षी ऊसतोड हंगामामध्ये ऑक्टोबर ते एप्रिलदरम्यान ते स्थलांतरित होतात. त्यांच्या‌सोबत त्यांची मुलेही स्थलांतरित होत असल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. त्यामुळे या विभागातील मुलांच्या शाळेतील गळतीचे प्रमाण अधिक असून शिक्षणाच्या अभावी ते बालमजुरीकडे ओढले जातात. ऊसतोड कामगारांच्या मुलांचा पुढील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी "संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना" सुरू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या गंगाखेड, सोनपेठ व पालम या 03 तालुक्यांच्या ठिकाणी मुलांसाठी 03 व मुलींसाठी 03 अशी एकूण 06 (प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमता) संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

त्यानुषंगाने गंगाखेड, सोनपेठ व पालम येथील ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना पुढील शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. या शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता 5 वी ते पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणारी ऊसतोड कामगारांच्या मुले- मुली/पाल्य प्रवेशास पात्र राहतील. शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, अभ्यासाकरिता टेबल, खुर्ची, पुस्तके, वह्या व इतर साहित्य ठेवण्यासाठी कपाट, कॉट, गादी, उशी, अंथरूण- पांघरूण, बेडशीट, ब्लँकेट, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व इंटरनेट वाय-फाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृहाचे अतिरिक्त गृहपाल अमृत.एम.मुंडे (मो.क्र. 9697254444) किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या