🌟तथागत भगवान बुध्दांच्या धम्माचे चक्र गतिमान करण्याची गरज - डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे


🌟पुर्णा तालुक्यातील सुरवाडीत आयोजित पहिल्या बौध्द धम्म परिषदेत बोलतांना डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांचे प्रतिपादन🌟 

पभणी, (दि.०२ मार्च) : बुध्दांच्या धम्माचे चक्र गतिमान करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी केले.


पूर्णा तालुक्यातील मौजे सुरवाडी येथे काल शुक्रवार दि.०१ मार्च २०२४ रोजी पहिल्या बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भदंत शिलरत्न थेरो नांदेड,भदंत रेवतबोधी मुदखेड यांच्यासह शिवसेना (उबाठा) दलित आघाडीचे संजय सारणीकर, उद्योजक संदीप ढगे, अमोल भालेराव, प्रशिक  सवणेकर, श्रीकांत हिवाळे, (गुरुजी) सचिन खरात आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

           पुढे बोलतांना हत्तीअंबीरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला आपणाला बौध्द धम्माची दीक्षा दिली. संपूर्ण भारत बौद्धमय व्हावा हे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत होते, असे नमूद करीत आपण गेल्या वर्षी परभणी ते चैत्यभूमी पर्यंत 580 किलो मीटरची भव्य धम्म पदयात्रा काढली. यामध्ये मोठ्या संख्येने धम्म अनुयायी सहभागी झाले होते. त्यानंतर लेह लडाख व थायलंड देशातही धम्म पदयात्रा केली, असे ते म्हणाले. भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांचे धम्माचे कार्य अविरत पणे सुरू असून त्यांच्यामुळे आपणाला ऊर्जा व कार्य करण्याची प्रेरणा मिळते. गेल्या काही दिवसांपूर्वी थायलंड येथील 50 बुध्दरुप मूर्तीचे वाटप केले. आता सुरवाडी येथील विहारात 6 फुटाची पंच धातूची बुद्ध मूर्ती देणार आहोत, असे ते म्हणाले.

             यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांची  धम्मदेसना पार पडली. श्रीकांत हिवाळे, साहेबराव वाटोडे  यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्तविक गोपाळराव वाटोडे  यांनी केले. धम्म परिषदेच्या सुरुवातीस गावात भगवान गौतम बुध्द व डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची धम्म मिरवणूक काढण्यात आली. सामूहिक बुद्ध वंदना पूजा विधी घेण्यात आला. यावेळी उपासकांनी भिक्खू संघाचे व मान्यवरांचे  स्वागत केले.

         दरम्यान राज्यात, देशात व थायलंडमध्ये  धम्म पदयात्रा यशस्वी केल्या बद्दल डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा धम्म परिषद समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. धम्म परिषद  यशस्वीतेसाठी साहेबराव वाटोडे, सदाशिव वाटोडे, लिंबाजी आळने, विश्‍वनाथ घोडके, देविदास वाटोडे यांच्यासह बौद्ध धम्म परिषद समितीने परिश्रम घेतले. या धम्म परिषदेला सुरवाडी व परिसरातील उपासक महीला - पुरुष  युवा वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या