🌟मराठवाड्यातील 8 व खानदेशातील नंदुरबार,धुळे,जळगाव अशा 11 जिल्ह्यातील शिक्षक या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार🌟
नांदेड (दि.30 एप्रिल)- विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या वतीने दि.2 मे ते 12 मे 2024 दरम्यान नांदेड येथे देवगिरी प्रांताचा आचार्य प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. या दहा दिवसीय प्रशिक्षण वर्गादरम्यान दहा दिवसांचे पायाभूत प्रशिक्षण आणि वैदिक गणित, संस्कृती ज्ञान परीक्षा, विमर्श या विषयांचे प्रत्येकी दोन दिवसीय मार्गदर्शन वर्गांंचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील आठ आणि खानदेशातील नंदुरबार, धुळे आणि जळगाव अशा आकरा जिल्ह्यातील शिक्षक या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत.
विष्णुपुरी नांदेड येथील इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, सहयोग कॅम्पस येथे हे प्रशिक्षण वर्ग 2मे ते 12 मे 2024 दरम्यान होणार आहेत. बालकांच्या समग्र विकासात जीवनाचा घनिष्ठ अनुभव, संस्कार, चरित्र निर्माण, क्षमतांचा विकास घडवून आणण्यासाठी शिक्षकांना (आचार्य) प्रशिक्षित करण्यासाठी विद्याभारती गेल्या 22 वर्षांपासून अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करते. शिक्षक, प्राधानाचार्य, पालक व शिक्षण प्रक्रियेतील सर्व महत्वाच्या घटकांसाठी या प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले असून निवास व भोजनव्यवस्थेसह पूर्णवेळ स्वरुपाचे हे वर्ग आहेत.
बारा शैक्षणिक व्यवस्थेतील क्रियाकलापांव्दारे पंचकोषाधारित, अनुभवाधिष्ठित, आनंददायी, अनौपचारिक, शास्त्रशुद्ध शिक्षण पध्दती विद्याभारतीने विकसित केली आहे. वय वर्ष 03 ते 08 अर्थात शिशुवाटिका तेे पहिली, दुसरी हा पायाभूत टप्पा समग्र विकासासाठी महत्त्वाचा आहे. तेव्हा या बालकांच्या वयोगटाला शिकविणारा आचार्य वर्गही तेवढाच उत्साही, तळमळीचा असावा लागतो. यासाठीच दरवर्षी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन देवगिरी प्रांतात केले जाते.
यासोबतच गणित विषय अधिकाधिक सोपा करून शिकविण्यासाठी विद्याभारतीने वर्गशः वैदिक गणिताचा अभ्यासक्रम तयार केला आहे. यातून गणिताचे उत्तर सोप्या पद्धीने काढण्याच्या क्लृप्त्या गणित शिक्षकाचा उत्साह नक्कीच वाढवतील. संस्कृती ज्ञान परीक्षा दरवर्षी विद्याभारती देवगिरी प्रांतातर्फे घेतली जाते ज्यातून भारतीय संस्कृती, ज्ञान विज्ञान, समृद्ध वारसा, जाज्वल्य इतिहास यांची ओळख होते.
या प्रशिक्षण वर्गाच्या व्यवस्थेची बैठक नुकतीच नांदेड येथे प्रांत सहमंत्री दिनेश देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडली. विद्याभारतीच्या श्रीमती वनमाला कुलकर्णी (प्रांत शिशु वाटिका प्रमुख), विजय (बाळूकाका) जोशी, रमेश मस्के, देवदत्त देशपांडे, सौ. कल्पना ना. कांबळे, आदित्य तुगनवार आदि या वर्गाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत......
0 टिप्पण्या