🌟जून महिन्याअखेर दररोज ३० ते ४० जनावरांवर उपचार करणे बंधनकारक🌟
✍🏻फुलचंद भगत
वाशिम :- जिल्ह्यात सुप्त अवस्थेत असलेले पशुवैद्यकीय दवाखाने आता जागृत करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी घेतला आहे. जिल्ह्यात कार्यरत सर्व पशुधन विकास अधिकारी आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी जून महिन्याअखेर दररोज ३० ते ४० जनावरांवर उपचार करण्याचे आदेश सीईओ वाघमारे यांनी काढले आहेत.
*पशुवैद्यकीय दवाखान्याची परिस्थिती विदारक :-
जिल्ह्यामध्ये एकूण 58 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, पट्टीबंधक आणि परिचर अशी आस्थापना कार्यरत आहे. प्रत्येक दवाखान्यांमध्ये किमान दोन ते तीन व्यक्तींचा स्टाफ कार्यरत असतांना बहुतांश वेळा सदर पशुवैद्यकीय दवाखाने बंद अथवा निष्क्रीय असल्याचे चित्र पाहावयास मिळते. या दवाखान्यांमधुन कोण्या दिवशी एकाही जणावरांची तपासणी व उपचार करण्यात येत नाहीत तर कधी दोन ते तीन एवढ्या नाममात्र पशुंवर उपचार करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या या विदारक परिस्थितीची गंभीर दखल सीईओ वैभव वाघमारे यांनी घेतली आहे. श्रेणी एक दवाखान्यामध्ये दररोज 40 आणि श्रेणी दोन दवाखान्यामध्ये दररोज किमान 30 पशुंवर उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
*मुक्या जणावरांचा वाली कोण ?
माणसांना काही आजार झाल्यास त्याला ते बोलुन व्यक्त करता येते व आवश्यकतेनुसार दवाखान्यात जाऊत त्यावर उपचार केले जातात. मात्र ज्यांच्याकडे वाचा नाही, ज्यांना बोलुन आपल्या भावना व विचार व्यक्त करता येत नाहीत अशा मुक्या जणवरांचे काही दुखत असल्यास त्यांचा वाली कोण असा निरागस प्रश्न संवेदनशिल व्यक्तींना पडतो. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांकडे असलेल्या पाळीव प्राण्याच्या व पशुधनांच्या सोयीसाठी शासनाच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखान्याची सुविधा करण्यात आली आहे. मात्र ज्या प्रमाणे माणसांच्या दवाखाण्याकडे लक्ष पुरविण्यात येते तसे पशुवैद्यकीय दवाखाण्याच्या बाबतीत घडतांना दिसत नाही. लोकाभिमुख प्रशासनाच्या ध्यासाने कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांनी पशुंच्या बाबतीतही आपली संवेदनशिलता दाखवली आहे.
*पशुपालक शेतकऱ्यांनी जागरूक राहावे :-
बहुतांश वेळा जनावरांची दवाखाने बंद असल्यामुळे व तेथे पुरेसा कर्मचारी वर्ग उपस्थित नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या जनावरांकरिता घरगुती इलाज करावा लागतात अथवा खाजगी पशुवैद्यकीय दवाखान्याची वाट धरावी लागते. त्यामुळे सीईओ वाघमारे यांनी आता आपला मोर्चा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याकडे वळविला आहे. निवडणूक संपन्न झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ कधीही आणि कोणत्याही पशुवैद्यकीय दवाखान्याला भेट देणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 4:30 वाजता या वेळेत संबंधित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यावर हजर असणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यावर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना वर्षभरात तीन उल्लेखनीय कामे करण्याचे निर्देश सीईओनी दिले यामध्ये येणाऱ्या जून महिन्याअखेर श्रेणी एक दवाखान्याची ओपीडी 40 आणि श्रेणी दोन दवाखान्याची ओपीडी 30 करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुढील वर्षभरातही सदर कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या ओपीडीमध्ये दवाखान्यात येणारी जनावरे आणि प्रत्यक्ष दौऱ्यावर जाऊन उपचार करण्यात येणाऱ्या जनावरांचा समावेश आहे. परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये जाऊन आपल्या जनावरांची नियमित तपासणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
"जिल्ह्यामध्ये एकूण 58 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची नियमित तपासणी करून घ्यावी. तसेच विविध आजाराबाबतच्या तपासण्या करून घ्याव्यात. सदर दवाखान्यांमध्ये अपेक्षित सेवा न मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करावी."
-वैभव वाघमारे (भाप्रसे), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
0 टिप्पण्या