🌟 पत्रकार संवाद यात्रा पोस्टरचे थाटात विमोचन : 28 जुलै रेाजी दिक्षाभूमी ते मंत्रालय निघणार यात्रा....!


 🌟यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले विमोचन🌟 

फुलचंद भगत

वाशिम : राज्यात पत्रकाराची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी 28 जुलैपासून नागपूर येथील दिक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत भव्य पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे यांच्या नेतृत्वात व प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले आहे. सदर यात्रेच्या पोस्टरचे विमोचन वाशिम येथील तिरुपती लॉन येथे 18 जुलै रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी माजी न.प. सभापती राजुभाऊ वानखेडे, व्यापारी मंडळ जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष उज्ज्वल देशमुख, कृ.उ.बा.स. संचालक नितीन करवा, माहेश्‍वरी संघटनेचे प्रदेश संयुक्त मंत्री शिवलाल भुतडा, जिल्हाध्यक्ष कैलास मुंदडा, सचिव सुनिल गट्टाणी, उद्योजक गिरीधारीलाल सारडा, आशिष हुरकट, शैलैष सोमाणी, मनिष तोष्णीवाल, कृष्णा चौधरी, महासभा सदस्य राजकुमार मुंदडा समवेत मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खासदार देशमुख यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराच्या शासन दरबारी करण्यात येत असलेल्या मागण्यांचा आपण पाठपुरावा करु, त्यांना न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेण्याचे स्पष्ट केलेले आहे. सदर यात्रा नागपूर येथील दिक्षाभूमी येथून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात येणार आहे. सदर यात्रेचा समारोप मंत्रालय येथे होणार आहे. यावेळी पत्रकाराने 20 मागण्या शासनाकडे केल्या असून, त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्‍या वाचकांना उत्पन्न करात वार्षीक 5 हजार रुपयाची सुट द्यावी, जाहीरातीवरील 5 टक्के जीएसटी कर रद्द करावा. ग्राम पंचायतला वृत्तपत्र खरेदीसाठी वार्षीक 10 हजार रुपयांची तरतूद आराखड्यात करावी, बाळशास्त्री जांभेकर निवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द कराव्या, अधिस्विकृती धारक पत्रिका पत्रकारांना मिळावी, ग्रामीण पत्रकाराला याचा लाभ देण्यात यावा. पत्रकार संरक्षण कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावे, पत्रकारांना रेल्वे, विमान, स्लिपर कोच, बस प्रवासात सवलत देण्यात यावी, टोल माफी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यात सदर यात्रा येणार असून, सर्व पत्रकार बांधवांनी या यात्रेच्या स्वागतासाठी उपस्थित रहावे, व पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विदर्भ अध्यक्ष निलेश सोमाणी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या