🌟परभणी महानगर पालिका आयुक्तांचा मनमानी कारभार : हकालपट्टी करण्याची भिमशक्ती संघटनेची मागणी....!


🌟मनपा आयुक्तांनी मागील दोन वर्षांपासून नवीन घरपट्टी केली बंद: घरपट्टी नसल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित🌟

परभणी (दि.२२ जुलै २०२४) : परभणी महानगर पालिका आयुक्तांनी मागील दोन वर्षांपासून नवीन घरपट्टी देणे बंद करुन मनमानी कारभार चालवल्याने परिणामी झोपडपट्टीतील नागरिकांना घरकुलांपासून वंचित रहावे लागत आहे त्यामुळे महानगर पालिका आयुक्तांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्हा भिमशक्ती संघटनेने केली आहे.

            भिमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे, म. महासचिव प्रवीण कणकुटे, म. उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, जिल्हा प्रवक्ते सुहास पंडित, तातेराव वाकळे, शहराध्यक्ष विक्रम काळे, तालुकाध्यक्ष राहुल कणकुटे, संजय वाव्हळे,दिपक कणकुटे, बबन वाव्हळे, अनिल सूर्यवंशी, सुरेश यादव आदींच्या एका शिष्टमंडळाने आज सोमवार दि.२२ जुलै रोजी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेवून एक तपशीलवार निवेदन सादर केले.

भिमशक्ती संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की एकीकडे शासन स्वच्छ भारतच्या नावाखाली परभणी जिल्ह्याला लाखो करोडोंचा निधी देत आहे तर दुसरीकडे मनपा आयुक्त सांंडभोर ह्या मनमानी पध्दतीने कारभार करत आहेत. त्यांच्या या आडमुठेपणामुळे घंटागाड्या बंद राहिल्या, त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग साचले. तसेच वस्त्या-वस्त्यांमधील नाल्यांचे घाण पाणी हे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत चालले असून शहरात सर्वत्र डेंंग्यूसारखे आजार झपाट्याने वाढत आहेत. डेंग्यूने एका 23 वर्षीय तरूणाचा बळी घेतला आहे. या सर्व बाबींना जबाबदार असलेल्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांची तात्काळ हकालपट्टी करून परभणी शहराला आजारमुक्त करावे, अशी मागणी केली.

          तसेच गेल्या दोन वर्षांपासून आयुक्तांनी मनमानी करून नवीन घरपट्टी देणे बंद केले आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील नागरिकांंना घरकुल घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. शहरामध्ये एकीकडे अनधिकृत बांधकामाचा ऊत आला आहे. तर दुसरीकडे गोरगरीब जनता शासनाच्या योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहे, अशी खंत व्यक्त करीत गेल्या दोन वर्षापासून बंद केलेल्या नवीन घरपट्टया चालू कराव्यात जेणे करून गरिबांना घरकुलाचा लाभ घेता येईल. तसेच परभणीची बकाल व भकास अवस्था झाल्याने मनपा आयुक्तांची तात्काळ हकालपट्टी करावी, अन्यथा भीमशक्ती संघटनेच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही भिमशक्ती संघटनेच्या पदाधिकर्‍यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या