🌟या कार्यशाळेस आमदार रत्नाकर गुट्टे,उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟
परभणी (दि.25 जुलै 2024) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्ह्यातील महिलांना लाभ घेता यावा यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत सर्व तालुक्यात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने अंगणवाडी सेविका-पर्यवेक्षिका आणि तलाठी, ग्रामसेवकांची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पूर्णा येथे संपन्न झाली.
या कार्यशाळेस आमदार रत्नाकर गुट्टे, उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार श्री. बोथीकर, गटविकास अधिकारी (पंचायत समिती) श्री. आंदिलवाड, तालुका आरोग्य अधिकारी श्री. गिनगिने, एकात्मिक बाल विकास योजनेच्या मनिषा काळे यांच्यासह तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जनजागृती करणे आवश्यक आहे. या योजनेच्या पात्रतेसंदर्भातील अनेक अटी शिथिल झाल्या आहेत. याची सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना माहिती द्यावी. तालुक्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी या योजनेचे पात्र लाभार्थी घरोघरी जाऊन शोधावेत, असे आवाहन आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थी महिलांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज भरून घेण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच योजनेमध्ये पात्र महिला लाभार्थी ठरविताना संबंधित महिलांना योजनेच्या अटी-शर्तींची माहिती देत, पात्रतेचे निकष, अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा, पात्र लाभार्थी, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आदींची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 13 हजार 290 अर्ज प्राप्त झाले आहेत. कार्यशाळा यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक व पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले.......
0 टिप्पण्या