फुलचंद भगत
वाशिम :- वाशिम जिल्हा परिषद सभागृहात दि.18 जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून रात्री 10.00 वाजेपर्यंत म्हणजे बारा तास 48 तक्रारींचा निपटारा करण्यात आला यापैकी 30 तक्रारी संबंधित विभाग प्रमुख यांच्या पातळीवर तर 18 तक्रारींचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वैभव वाघमारे यांच्यासमक्ष निपटारा करण्यात आला. दरम्यान मागच्या तक्रार निवारण दिनी 146 तक्रारी आल्या होत्या त्यात घट होऊन आता केवळ 52 तक्रारदारांनीच जिल्हा परिषदेकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. त्यातील 48 तक्रारदार प्रत्यक्ष हजर होते. म्हणजे लोकांचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे हे द्योतक आहे असे मानायला हरकत नाही.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनी (दि. 18) आपली तक्रार मांडण्यासाठी जिल्हा परिषदेकडे एकूण 52 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. जि. प. च्या वतीने तक्रारदारांना पत्र देऊन तक्रार निवारण दिनी मुळ तक्रारीसह उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते. तक्रार निवारण दिनी यापैकी 48 तक्रारदार हजर होते.
*रात्री जवळपास दहा वाजेपर्यंत सीईओंसमोर तक्रारींचा पाढा :-
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि संबंधित कर्मचारी यांच्या मार्फत एकूण 48 तक्रारींचा निपटारा करण्यात आला. विभागाकडून ज्या तक्रारदारांचे समाधान झाले नाही अशा 18 तक्रारदारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्याकडे आपली कैफियत मांडली. दिवसभर कामाच्या व्यस्ततेमुळे सीईओ वाघमारे हे लोकांना उपलब्ध होऊ शकले नाही मात्र कार्यालयीन कामकाज आटोपुन त्यांनी तक्रारदार नागरिकांना वेळ दिला. सायं. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत त्यांनी 18 तक्रारदारांचे गाऱ्हाणे ऐकुण त्यावर निर्णय दिला. मागच्या तक्रार निवारण दिनाच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी होते.
*लोकांचे समाधान; तक्रारीत घट*
लोकांच्या तक्रारीचा वेळेत निपटारा करण्यासाठी व त्यांच्या समस्यांवर योग्य तोडगा काढण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी जिल्हा परिषदेत तक्रार निवारण दिन घेण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी यापूर्वीच काढले होते. त्यानंतर हा दुसरा तक्रार निवारण दिवस होता. पहिल्यावेळी 146 तक्रारी होत्या त्यात घट होऊन आता केवळ 52 तक्रारदारांनीच जिल्हा परिषदेकडे आपले गाऱ्हाणे मांडले होते. विशेष म्हणजे पंचायत समिती स्तरावरुन एकही तक्रार यावेळी आली नाही. याचा अर्थ लोकांचे प्रश्न सुटत असुने त्यांचे समाधान होत असल्याचे हे द्योतक आहे. पुढील तक्रार निवारण दिन 16 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
* तक्रारीत पंचायत विभागाची आघाडी :-
मागील तक्रार निवारण दिनामध्ये सर्वाधिक तक्रारी पंचायत विभागाच्या होत्या. याहीवेळेस पंचायत विभागच आघाडीवर होता. जिल्हा परिषदेकडे एकूण 52 प्राप्त तक्रारीपैकी 48 तक्रारदार हजर होते. यामध्ये पंचायत विभागाच्या सर्वाधिक 34 तक्रारींचा समावेश होता. त्यापैकी 31तक्रारदार सभागृहात प्रत्यक्ष हजर होते. हजर असलेल्या 31 पैकी 20 तक्रारदारांच्या तक्रारींचा निपटारा पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला होता. उर्वरित 11 तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. पंचायत विभागानंतर शिक्षण विभागाच्या 6 आणि आरोग्या विभागाच्या 5 तक्रारी होत्या. आरोग्य विभागाच्या 3, महिला व बाल कल्याण 2,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि ग्रामिण पाणी पुरवठा विभाग यांची प्रत्येकी 1 तक्रार होती. जिल्हा परिषदेच्या इतर 10 विभागाबाबत एकही तक्रार आली नाही......
0 टिप्पण्या