🌟परभणी महानगर पालिकेच्या वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांना निलंबीत करा.....!


🌟परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी🌟

परभणी :- परभणी शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी साचलेले कचर्‍याचे ढिगारे यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात नगरसेवक, नागरीक, लोकप्रतिनीधी यांनी निवेदने देवून सुध्दा मनपा आयुक्तांनी कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे शहरातील नागरीकांत तीव्र संताप व्यक्त होत असून नागरीक तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे परभणी महापालिकेतील वादग्रस्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मंगळवार दि.30 जुलै 2024 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

                   आ.डॉ.पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेवून परभणी शहरातील विविध मुलभूत प्रश्‍नांवर लक्ष वेधले. परभणी महापालिकेवर प्रशासक तथा आयुक्त म्हणून तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचार्‍यांचा वेतनाचा प्रश्‍न प्रलंबित राहिल्याने सातत्याने कर्मचारी संपावर जात आहेत. त्यासोबतच अनेक वेळा वीज बिल भरले नसल्यामुळे पाणी पुरवठा खंडित होत आहे. काही दिवसापूर्वी सफाई कामगार व घंटागाडी चालकांनी वेतनासाठी संप पुकारला होता. त्यामुळे पंधरा दिवस घंटागाड्या बंद राहिल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिगारे साचून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारी घटना घडत असताना मनपा आयुक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. शहरांमध्ये सर्वत्र खड्ड्यांचे जाळे पसरले आहे. साधा मुरुमही टाकण्याची तसदी मनपा आयुक्तांनी घेतली नाही. दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कर वसुली होते परंतु एकही काम केल्या जात नसल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

                    शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात वारंवार निवेदने दिले, आंदोलने केली परंतू मनपा आयुक्तांच्या कामात सुधारणा झाली नाही. उलट नागरिकांना उध्दटपणाचीवागणूक देणे, भेट देण्याचे टाळणे, लोकप्रतिनिधींचे देखील न ऐकण्यामुळे वादग्रस्त झालेल्या मनपा आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करावी. तसेच त्यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या कामांची निधी वाटपाची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी आ.डॉ.पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. मनपा आयुक्तांचे निलंबन न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा यावेळी आ. डॉ. पाटील यांनी दिला.

                दरम्यान, महापालिकेच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या कारभाराला संपूर्ण परभणीकर मागील दोन वर्षापासून वैतागलेले आहेत. अनेक तक्रारी करूनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई किंवा त्यांची बदली देखील होत नाही. त्यामुळे त्यांना मंत्रालयातून कोणाचे अभय आहे, असा प्रश्‍न आ. डॉ. पाटील यांनी केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या