🌟पुर्णा शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी तरीही नगर परिषद प्रशासनाने नागरीसुविधांचा केला अंत्यविधी ?


🌟शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे व त्यात साचलेले पाणी नागरिकांना करुन देत आहे 'गोव्यातील समुद्रतटाची' आठवण🌟



पुर्णा (विशेष वृत्त) :- पुर्णा नगर परिषद प्रशासनाला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनासह केंद्र शासनाचा कोट्यावधी रूपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहरातील सार्वजनिक रस्त्यांसह नाल्यांची अवस्था अक्षरशः गोव्यातील समुद्र किनाऱ्या सारखी झाल्याचे निदर्शनास येत असून अविकसित पुर्णा शहरातील ही झालेली अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहून देखील तुम्हाला भ्रष्ट नौकरशहा आणी खादीतील खादाडांच्या दान धर्मातून  'गोव्यात आनंदोत्सव' साजरा करावा वाटत असेल तर तुमच्या सारखे कर्मदारीद्री तुम्हीच असे म्हणण्याची वेळ आता तमाम शहरवासीयांवर आली असून जोरदार पाऊस पडल्यानंतर तुम्हाला अक्षरशः 'गोव्याचा आनंद' पुर्णा शहरातच मिळवून देण्याची किमया जर कोणात असेल तर ती पुर्णा नगर परिषदेतील अकार्यक्षम  अधिकारी/कर्मचाऱ्यांमध्येच कारण महाराष्ट्र शासनासह अनेक राज्यसभा/विधान परिषद सदस्यांनी शहरातील विकासासाठी 'न भुतो न भविष्यती' असा कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त करून दिल्यानंतर देखील या विकासनिधीचा सदुपयोग करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात दुरुपयोगच झाल्याचे पहावयास मिळत असून शहरातील अनेक निर्मनुष्य वसाहतींमध्ये थातूरमातूर सिमेंट रस्ते/सिमेंट नाल्यांची बांधकाम,उद्यान (पार्क),बिनलाईटांचे हजारो पोल,सार्वजनिक सभागृह आदी निरुपयोगी निकृष्ट कामांवर भ्रष्ट गुत्तेदार व पडद्यामागील खादीतील खादाडांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधातून उधळपट्टी होत असतांना मात्र शहरातील विविध चौक परिसरांना वसाहतींना तसेच धार्मिक स्थळे महापुरुषांच्या पुतळा परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरील मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून या परिसरात अक्षरशः गोव्यातील समुद्रतटासारखी अवस्था होत असतांना नगर परिषद मुख्याधिकारी युवराज पौळ आपल्या कर्तव्याचे भान विसरले की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुर्णा शहरातील मुख्य बाजारपेठेतील शिवतिर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चौक,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,सम्राट अशोक रोड,स्वामी दयानंद सरस्वती चौक,महात्मा बसवेश्वर चौक,महाविर नगर,नगर परिषद परिसर,छत्रपती शिवाजी महाराज नगर रोड,छत्रपती संभाजी महाराज चौक,दत्त मंदिर परिसर, पोलीस स्थानक रोड,कै.राजाभाऊ बरदाळे भाजी मंडई परिसर आदी परिसरातील सार्वजनिक रस्त्यांवरील खड्यात पावसासह स्वच्छतेअभावी तुटूंब भरलेल्या नाल्यांतील पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने या रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमुळे खड्यांतील अस्वच्छ पाणी परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर व्यापारी प्रतिष्ठानातील ग्राहकांसह व्यापाऱ्यांच्या अंगावर देखील उडत असल्यामुळे शहरातील नागरिकांत नगर परिषद प्रशासना विषयी संताप व्यक्त होत असून त्यामुळे शहरात डायरीया,मलेरीया,काविळ,डेंग्यू आदींसह विविध साथिंचे आजार फैलण्याची शक्यता नाकारता येत नही........


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या