🌟परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी घेतला शासनाच्या विविध महत्त्वकांक्षी योजनांचा आढावा.....!


🌟योजनांच्या अंमलबजावणीलच्या कामाला प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले🌟 


परभणी (दि.24 जुलै 2024) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने घोषित केलेल्या महत्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतला.

यावेळी मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, मनपा अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते, समाज कल्याण सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सुरवसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता सहायक आयुक्त प्रशांत खंदारे, उच्च शिक्षण विभागाच्या सरिता मुळवे, शिक्षणाधिकारी आशा गरुड, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

राज्य शासनाने अनेक महत्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना घोषित केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यासाठी तसेच योजनांची योग्य आणि प्रभावी अंमलबजावणी, योजनाचे कार्यान्वयन करण्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.

 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजनांचा यामध्ये समावेश असून, जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याबाबत ग्रामपातळीवर गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रकाशित करून तिचे चावडी वाचन होत असल्याची खात्री करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. या योजनेमध्ये जास्तीत जास्त पात्र महिलांना सहभागी करून घेण्यासाठी सर्वातोपरी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.   

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेच्या आशा गरुड तर मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना व मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांनी या योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योजनेसंदर्भात वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांचे फॉर्म अचूक भरून घेणे, अपात्र ठरत असल्यास संबंधितांना योग्य आणि अचूक माहिती देणे तसेच ही सर्व माहिती वेळेत आणि अचूकरित्या वरिष्ठांपर्यंत पोहो‍चविण्याच्या सूचना केल्या.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेल्या सर्व महत्त्वपूर्ण आणि लोककल्याणकारी योजनांचा वेळोवेळी मंत्रालय स्तरावरून आढावा घेतला जाणार असून, या कामाला प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या