🌟प्रा.वसंत बापट जयंती विशेष : १९४२ च्या चले जाव चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका....!


🌟प्रा.वसंत बापट यांचा जन्म दि.२५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे झाला🌟

संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा; बंगालीतील, विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील-मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदवादी प्रवृत्ती ह्यांचे ठळक संस्कार बापटांच्या कवितेत झालेले दिसतात. बापटांची अस्सल रसिकता आणि अतींद्रिय प्रतिमासृष्टी हेही त्यांच्या कवितेचे विशेष लक्षणीय पैलू होत. संग्रही ठेवण्याजोगी महत्त्वपूर्ण माहिती श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजींच्या या लेखात शोधा... संपादक.

            प्रा.वसंत बापट यांचा जन्म दि.२५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण सन १९४८मध्ये पुण्याच्या स.प.महाविद्यालयात झाले. त्यानंतर ते मुंबईतील नॅशनल कॉलेज आणि रामनारायण रुईया कॉलेज या महाविद्यालयांतून मराठी आणि संस्कृत विषयांचे प्राध्यापक होते. सन १९७४पासून मुंबई विद्यापीठातील गुरुदेव टागोर अध्यासनाचे ते प्राध्यापक होते, साहित्य अकादमीचे सदस्यही होते. प्रा.बापट हे स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. सन १९४२च्या चले जाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ऑगस्ट १९४३ ते जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरूंगात होते. सन १९४७ ते १९८२पर्यंत ते मुंबई विद्यापीठात प्राध्यापक होते. सन १९८३ ते १९८८पर्यंत ते सा.साधनाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते संलग्न होते. सन १९७२ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. संस्कृतातील अभिजातता आणि नादवती शब्दकळा; बंगालीतील, विशेषत: गुरुदेव टागोरांच्या कवितेतील-मानवतावाद आणि इंग्रजी कवितेतील स्वच्छंदवादी प्रवृत्ती यांचे ठळक संस्कार बापटांच्या कवितेत झालेले दिसतात. बापटांची अस्सल रसिकता आणि अतींद्रिय प्रतिमासृष्टी हेही त्यांच्या कवितेचे विशेष लक्षणीय पैलू होत. बारा गावचे पाणी-१९६७ हा बापटांचा प्रवासवर्णनपर ग्रंथ. बापटांच्या रसिक मनाने भारताचा निसर्ग, चालिरीती, लोककला, देशानिक प्रगतीच्या दिशेने होत असलेली त्याची वाटचाल यांचे जे दर्शन घडले, त्याचे प्रत्ययकारी चित्रण या ग्रंथात त्यांनी केले आहे. 


            लहानपणापासून बापटांवर राष्ट्र सेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. बिजली-१९५२ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. अकरावी दिशा-१९६२, सकीना-१९७२ आणि मानसी-१९७७, या त्यांच्या बिजलीनंतरच्या काव्यसंग्रहातून त्यांच्या अनुभवांचे क्षेत्रही उत्त्तरोत्तर अधिकाधिक विस्तारत गेल्याचे दिसते. संस्कृत, बंगाली आणि इंग्रजी कवितेचा प्रभावही या कवितेवर दिसून येतो. सामाजिक विषमता आणि अन्याय यांच्या तीव्र जाणिवे बरोबरच यौवनाचा अभिजात डौल, निसर्गाच्या विभ्रम-विलांसाहून खट्याळ शृंगार व्यक्तविण्याची प्रवृत्ती, लावणीसारख्या जुन्या काव्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याचा रसिक प्रयत्न यांचा प्रत्यय त्यांच्या बिजलीनंतरच्या कवितेत येतो. त्यांच्या कवितेचे परिपक्व रुप मानसीमध्ये विशेषत्वाने जाणवते. या काव्यसंग्रहातील त्यांची कविता मितभाषी; परंतु आशयदृष्ट्या अधिक गहन अशी आहे.

        जनजागृति करणे हेही कवितेचे एक महत्त्वाचे कार्य आहे, असे बापट मानत असल्यामुळे राष्ट्रीय संकटाच्या, दु:खाच्या वा देशातील विविध जन-आंदोलनांच्या प्रसंगी त्यांनी आपली संवेदनशील प्रतिक्रिया आपल्या कवितेतून व्यक्तविली आहे. "उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू" ही त्यांची गाजलेली कविता किंवा त्यांनी रचिलेला संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा ही त्याची काही उल्लेखनीय उदाहरणे होत. गांधींची जीवनयात्रा-१९४८, नव्या युगाचे पोवाडे-भाग १ ते ३, सैन्य चालले पुढे-१९६५, या त्यांच्या रचनाही या संदर्भात निर्देशनीय आहेत. चंगामंगा, अबडक तबडक, आम्ही, गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता, परीच्या राज्यात या त्यांनी लिहीलेल्या बालकविता. सेतु या काव्यसंग्रहास व लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या बाल- गोविंद-१९६५ या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला. साहित्याभ्यास-१९८१ हा त्यांचा अगदी अलिकडील ग्रंथ. संगीत, अभिनय, लोककला. यांची उत्तम जाण बापटांच्या ठायी आहे. राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन यांसारख्या यशस्वी कार्यक्रमातून तिचा प्रत्यय येतो.     

        त्यांच्या एका काव्यसंग्रहाला साहित्य पुरस्कार मिळाला आहे. बिजली, सेतू, अकरावी दिशा, सकिना, मानसी, शिंग फुंकिले रणी, शूर मर्दाना पोवाडा, तेजसी, राजसी, प्रवासाच्या कविता आदी प्रसिद्ध आहेत. बारा गावचं पाणी हे प्रवासचित्र, जिंकुनि मरणाला हे व्यक्तिदर्शन, तोलनिक साहित्याभ्यास ही समीक्षा, तर विसाजीपंताची बखर ही राजकीय उपहास प्रसिद्ध आहेत. वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि विंदा करंदीकर यांच्या संयुक्त काव्यदर्शनाचे अर्ध शतकाहून अधिक काळ देशभरात कार्यक्रम झाले. सन १९६९मध्ये त्यांनी युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. सन १९७७ आणि १९९३मध्ये आखाती देशात त्यांच्या काव्यदर्शनाचे कार्यक्रम झाले. सामाजिक, वाङमयीन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक विषयांवर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांची व्याख्याने झाली. साहित्य अकादमीच्या कार्यकारिणीवर ते १० वर्षे होते. याशिवाय इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मास कम्युनिकेशन्स दिल्ली या संस्थेचे ते अनेक वर्षे सदस्य होते. अशा या बावनकशी साहित्यिकाचे दि.१७ सप्टेंबर २००२ रोजी दुःखद निधन झाले.

!! प्रा.वसंत बापट यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जी !!


                    - संकलन व सुलेखन -

                     श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                     रामनगर वॉर्ड, गडचिरोली.

                   फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या