🌟रोजगार हमी योजनेचे खरे शिल्पकार म्हणून देखील पागे यांच्याकडे बघीतले जाते🌟
वि.स.पागेंची रोजगार हमी योजना ही एकमात्र कल्पना होती असे नाही, तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबविलेला वीस कलमी कार्यक्रम ही कल्पना पागेंचीच होती. इंदिराजींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यांनी एकांतात पागे यांच्याकडून या नामी कल्पना ऐकून समजून घेतल्या. त्यानंतर ही वीस कलमी कार्यक्रमांची कल्पना पंतप्रधानांचीच असल्याचे सांगण्यास बाध्य केले. इतरत्र याची वाच्यता न करण्याचेही पागेंना सांगण्यात आले, असे आपल्या वाचनात आले आहे. अशी अभ्यासपूर्ण माहिती श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींच्या या लेखात जरूर वाचा...संपादक.
स्वातंत्र्यसैनिक,रोजगार हमी योजनेचे जनक,महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे माजी सभापती, साहित्यिक, कवी व नाटककार वि. स. पागे यांची आज जयंती. त्यांचे पूर्ण नाव विठ्ठल सखाराम पागे. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बागणी येथे दि.२१ जुलै १९१० रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथे झाले. ते सातव्या इयत्तेत पहिले आले होते. त्यानंतर ते संस्कृत विषय घेऊन बीए झाले. त्यानंतर त्यांनी एलएलबी ही कायद्याची पदवी घेतली. लहानपणापासूनच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. वाळवा हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. सन १९३०ची कायदेभंगाची चळवळ तसेच सन १९४२चे भारत छोडो आंदोलन यांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५२ ते १९६० या कालावधीत ते विधान परिषदेचे सदस्य झाले. त्यानंतर वर्ष १९६० ते १९७८ सुमारे अठरा वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी विधान परिषदेचे अध्यक्ष होते.
अत्यंत संयमी, शांत असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. रोजगार हमी योजनेच्या कल्पनेबद्दल एक गोष्ट सांगितली जाते.महाराष्ट्रात साधारण १९७१ ते १९७४ या कालावधीमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी शेतकरी व कामकरी यांची परिस्थिती गंभीर झाली होती. दुष्काळाच्या या परिस्थितीचा विचार करीत ते एकदा आपल्या घरी झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला विचारले, “प्रभा, घरात पैसे किती आहेत ?" प्रभाताईंनी सांगितले, की सातशे रुपये आहेत. त्यावर त्यांनी विचारणा केली, की सातशे रुपयांत शेतावर किती गडी राबू शकतील ? घरातून सांगण्यात आले, की वीस दिवस चौदा-पंधरा गडी सहज लावता येतील. मग काय त्यांनी थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाच पत्र लिहायला घेतले. त्यातील मजकूर असा होता- “माननीय मुख्यमंत्री साहेब, माझ्या शेतावर सातशे रुपयांत चौदा-पंधरा दिवस वीस गडी मजुरीला लावता आले. शंभर कोटी रुपये बाजूला काढलेत, तर किती मजुरांना काम देता येईल?" रोजगार हमी योजनेचा जन्म या चार ओळींमध्ये झाला. वसंतराव नाईक यांनी लगेचच पागे यांना बोलावून घेतले. नेमकं काय करायला हवं ते सगळं विचारून घेतलं. योजना फारच छान होती. पण शंभर कोटी रुपये कुठून आणायचे? या प्रश्नाने मुख्यमंत्री चिंतेत पडले. त्यावेळी शंभर कोटी रुपये खूप मोठी रक्कम होती. त्यांनी या विषयावर विरोधी पक्षनेत्यांसह खास बैठक बोलावली. या बैठकीत त्यावेळचे विधानसभेतले विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप उपस्थित होते. ते म्हणाले, की नाईकसाहेब, गरिबांना काम देत असाल तर या योजनेसाठी शंभर कोटी रुपये उभे करण्यास विधानसभेत आम्ही कर प्रस्ताव घेऊन येतो. जगाच्या संसदीय लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाला संपूर्णपणे मदत करण्यासाठी कर प्रस्ताव आणण्याची भूमिका सर्वप्रथम महाराष्ट्रातच घेतली गेली.
वि.स.पागेंची रोजगार हमी योजना ही एकमात्र कल्पना होती असे नाही, तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबविलेला वीस कलमी कार्यक्रम ही कल्पना पागेंचीच होती. इंदिराजींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले. त्यांनी एकांतात पागे यांच्याकडून या नामी कल्पना ऐकून समजून घेतल्या. त्यानंतर ही वीस कलमी कार्यक्रमांची कल्पना पंतप्रधानांचीच असल्याचे सांगण्यास बाध्य केले. इतरत्र याची वाच्यता न करण्याचेही पागेंना सांगण्यात आले, असे आपल्या वाचनात आले आहे. पागे हे कवी, नाटककार होते. त्यांचे पहाटेची नौबत आणि अमरपक्षी या नावाचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी वीर मोहन नावाचे नाटक लिहिले होते. तसेच निवडणुकीचा नारळ नावाची नाटिका लिहिली होती. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत हे संगीत नाटक त्यांनी लिहिले. पागे व नाईक दोघेही ग्रामीण भागातील असल्याने त्यांना शेतकरी व कामकरी यांच्या प्रश्नांची चांगली जाण असल्यामुळे रोजगारनिर्मिती व त्यातून विकास साधण्याची खरी प्रक्रिया सुरू झाली. रस्ते, पाझर तलाव, नाला बंडिंग, विहिरी अशा प्रकारची कामे सुरू झाली. अशातच दि.१६ मार्च १९९० रोजी विठ्ठल स. पागे यांचे निधन झाले.
!! जयंती निमित्त वि.स.पागे यांना व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन !!
श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
रा. रामनगर वॉर्ड, गडचिरोली,
फक्त व्हॉ.नं. ९४२३७१४८८६.
0 टिप्पण्या