🌟महाराष्ट्र विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची पाथरीतील भव्य नागरी सत्कारात ग्वाही🌟
परभणी : परभणी जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित असून पाथर्डी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार या नात्याने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांनी पाथरीत आयोजित भव्य नागरी सत्कार कार्यक्रमा प्रसंगी दिली.
विधान परिषदेच्या निवडणूक पार पडल्यानंतर आमदार राजेश विटेकर यांचे शुक्रवार दि.१९ जुलै २०२४ रोजी परभणी जिल्ह्यात आगमन झाले यावेळी महायुतीतील घटक पक्ष असणार्या शिवसेना पक्षाच्या वतीने पाथरीत आ.राजेश विटेकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले त्यासाठी शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी आष्टी फाट्यापासून भव्य मोटारसायकल रॅली काढली. तसेच नवा मोंढा परिसरातील शिवसेना भवन येथे सहा जेसीबीद्वारे फुलांची उधळण करण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने ५०० किलोचा हार घालून आमदार विटेकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर पाथरी शहराजवळील अंजली मंगल कार्यालयात विटेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
मानवतमध्येही आमदार विटेकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विटेकर यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. परंतु, ऐनवेळी पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे आपणास माघार घ्यावी लागली, असे नमूद करीत परभणीतील जाहीर सभेत अजितदादा पवार यांनी ‘राजेश विटेकरला येत्या सहा महिन्यात विधी मंडळाचा सदस्य करणार’ अशी ग्वाही दिली होती. त्यांनी तो शब्द खरा ठरविला असून १२ जूलै रोजीच्या विधान परिषद निवडणूकीत त्यांनी आपणास निवडून आणले. अजितदादा यांच्यासह महायुतीच्या सर्वच नेत्यामुळे मला ही संधी मिळाली आहे. निश्चितच आपण या संधीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधान्याने प्रयत्न करु, अशी ग्वाही विटेकर यांनी दिली.
दरम्यान, येत्या दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. महायुती सर्वच जागा पूर्ण ताकदिनिशी व एकदिलाने लढविणार असून सर्वच्या सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा निश्चितच विजय होईल, असा विश्वासही विटेकर यांनी व्यक्त केला.....
0 टिप्पण्या