🌟महसूल सप्ताहाला दि.०१ ऑगस्ट रोजी असलेल्या महसूल दिनापासून सुरुवात🌟
परभणी (दि.२९ जुलै २०२४) :- सर्वसामान्य नागरिकांची जिल्हास्तरीय महसूलविषयक कामे वेळच्यावेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्ययावत करण्यासह राज्य शासनाच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. गुरुवार दि.०१ ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहात मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
तसेच वसुलीच्या नोटिशी पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांची चौकशी करणे इत्यादी कामे वेळेत व वेळापत्रकानुसार करणारे आणि महसुली वसुलीचे उद्दिष्ट पार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता आणि महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरिता ‘महसूल दिन’ गुरुवार दि.०१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार दिनांक १ ते ७ ऑगस्ट, २०२४ दरम्यान महसूल विभागामार्फत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. १ ऑगस्ट रोजी ‘महसूल दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी महसूल दिनापासून ७ ऑगस्टपर्यंत राज्यभरात ‘महसूल सप्ताह २०२४’ आयोजित करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यात महसूल विभागातर्फे महसूल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये गुरुवारी (दि.१) जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल दिन आणि सप्ताहाच्या प्रारंभी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’शी संबंधित कार्यक्रमाचे सकाळी १०.३० आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी या कार्यक्रमाचे नियोजन करत असून, रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी या जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. तहसीलदार, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर आणि ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने'चा कार्यक्रमाचे अधीक्षक अभियंता राज्य विद्युत वितरण विभाग यांच्या नेतृत्वात मानवत तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार (दि.२) रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला असून, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच इतर मागासवर्ग प्रवर्गातील मुलींना शिक्षणशुल्क व परीक्षाशुल्काच्या ५० ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करणे या कार्यक्रमाचे पुर्णा तहसील कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.०३ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हा कार्यक्रम उपविभागीय कार्यालय गंगाखेड येथे आयोजित करण्यात आला असून रविवार दि.०४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता तहसील कार्यालय, जिंतूर येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे समाज कल्याण विभागामार्फत आयोजन करण्यात आले आहे. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाथरी येथे सकाळी १०.३० वाजता ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.०५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांनी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालयाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११.३० वाजता ‘सैनिक हो तुमच्यासाठी’चे आयोजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक अधिकारी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत.
मंगळवार दि.०६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता तहसील कार्यालय सेलू येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक हात मदतीचा- दिव्यांगाच्या कल्याणाचा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी बुधवारी दि.०७ रोजी श्रीहरी मंगल कार्यालय जिंतूर रोड येथे महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी –कर्मचारी यांचा संवाद, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताहाचा समारोपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम निवासी उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून आयोजित करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
महसूल सप्ताहामध्ये महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, नागरिकांमध्ये त्याबाबत जागरुकता वाढावी शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महसूल सप्ताहामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे......
0 टिप्पण्या