🌟शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या नेत्या अंबीका डहाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी🌟
परभणी (दि.१९ जुलै २०२४) : परभणी महानगर पालिकेच्या आयुक्त सौ.तृप्ती सांडभोर यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या नेत्या तथा माजी नगरसेविका सौ.अंबीका अनिल डहाळे यांनी आज शुक्रवार दि.१९ जुलै रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या नेत्या सौ.अंबिका डहाळे यांच्यासह वंदना कदम, कविता नंदुरे, वैशाली खांडे, कांचन राठोड, रेखा बोखारे, सुनीता कांबळे, संगीता टेहरे, स्वाती मोरे आदिसह महिलांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्याद्वारे, परभणी शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून नागरिकांना पाठदुखी व मणक्याचे आजार होऊ लागले आहेत. महापालिकेची नालेसफाई नियमितपणे होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच कहर म्हणजे कचरा संकलित करणार्या घंटागाड्याही नियमित येत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेचे प्रशासन पूर्णपणे ढेपाळले असून सध्या त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही, असे नमूद केले. नागरी सुविधांबाबत वारंवार निवेदनाद्वारे मागणी करुन, आंदोलने करुनही आयुक्त त्याकडे कानाडोळा करीत आल्या आहेत. परिणामी कुठल्याही नागरी सुविधा मिळत नसल्यामुळे शहरवासीयांचे हाल होत आहेत, असेही म्हटले.
महापालिकेच्या आयुक्तांच्या कारभाराविषयी सातत्याने आवाज उठवूनही कोणतीच कार्यवाही होत नाही उलट महापालिकेने वाढवलेले उपकर व शास्ती यांची वाढीव भर जनतेच्या माथी बसली आहे. राजकीय वरदहस्तामुळे श्रीमती सांडभोर या टिकून आहेत, एवढेच नव्हे तर त्यांना पदोन्नतीही देण्यात आली आहे. अकार्यक्षम अधिकार्यास सरकारने पदोन्नती देणे ही बाब परभणीकरांवर अन्याय करणारी असून श्रीमती सांडभोर यांची तात्काळ बदली करण्यात यावी व परभणीकरावरील अन्याय दूर करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे......
0 टिप्पण्या