🌟राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीतील संवाद दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद🌟
परभणी (दि.२६ जुलै २०२४) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शुक्रवार दि.२६ जुलै रोजी संवाद दौऱ्या निमित्त परभणीत आले असून शहरातील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या निष्ठावानांच्या संवाद मेळाव्या प्रसंगी बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की लोकसभा निवडणूक असो की विधानसभा निवडणूक प्रत्येक निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने केलेल्या फसव्या घोषणांना आता सर्वसामान्य जनता अक्षरशः वैतागली आहे.
परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस भवनातात आज शुक्रवारी आयोजित केलेल्या निष्ठावानांच्या संवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील,जिल्हाध्यक्ष माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, माजी आमदार सिताराम घनदाट,माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार व्यंकटराव कदम,भिमराव हत्तीअंबीरे,अजय गव्हाणे, प्रा. किरण सोनटक्के,माजी नगरसेवक जाकेर लाला,मनिषा केंद्रे, रितेश काळे, सोनाली देशमुख,अतिश गरड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणातून पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर कडाडून टिका केली. या पक्षाने सातत्याने नकारात्मक राजकारण केले. विशेषतः विरोधकांना, विरोधी पक्षांना संपविण्याचा कुटील डाव खेळला. स्वतःची अख्खी हयात घालून पक्ष उभारणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार असो, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे पापसुध्दा भाजपाने केले. त्यामुळेच या निवडणूकीत भाजपास त्या पापाचे प्रायश्चित्त निश्चितच भोगावे लागेल, अशी टिका केली. प्रत्येक निवडणूकीच्या समोर घोषणांचा पाऊस पाडायचा अन् सत्तेत आल्यावर त्या घोषणांकडे कानाडोळा करायचा, हे सत्र आता सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे ते फसव्या घोषणांना बळी पडणार नाहीत, असे ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ज्या ज्या जिल्ह्यात ताकद आहे, त्या ठिकाणी बैठकांचे सत्र अवलंबून सर्वतोपरि स्थितीचा आढावा घ्यावयाचा निर्णय घेतला आहे, असेही पाटील यांनी नमूद केले. आगामी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही आमदार पाटील यांनी दिली.
दरम्यान, जिल्हाध्यक्ष अॅड. गव्हाणे यांनी आपल्या भाषणातून महायुतीच्या जातीवादी विचारांवर जोरदार टिका टिप्पणी केली. लोकसभा निवडणूकीत काही जिल्ह्यात जातीवादी विचार पेरण्याचा भाजपाने केलेल्या प्रयत्नांना सर्वसामान्य जनतेने मोठा तडाखा देवून अद्दल घडविली आहे, असे नमूद करीत परभणीसह अन्य जिल्ह्यातील सामान्य जनता महाविकास आघाडीच्या विकासात्मक विचारांना साथ देणारी आहे, हे त्या विजयावरुन स्पष्ट होते, असेही ते म्हणाले. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराच्या मागे राष्ट्रवादी भक्कमपणे उभी राहील, अशी ग्वाही देवून अॅड.गव्हाणे यांनी विधानसभा निवडणूकीत निष्ठावंतांचाच उमेदवारीच्या वाटपात विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्येने निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते........
0 टिप्पण्या