🌟परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर विधान परिषद निवडणूकीत विजयी....!


🌟राजेश विटेकर यांना विधानपरिषद निवडणूकीत निवडून आणून अजित पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला🌟 

परभणी (दि.12 जुलै 2024) : परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते राजेश विटेकर हे विधान परिषद निवडणूकीत पहिल्या पसंती क्रमांकाची 23 मते पटकावून विजयी झाले आहेत.


 महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांकरीता आज शुक्रवार दि.12 जुलै रोजी सायंकाळी मतदान झाले त्या पाठोपाठ मतमोजणीची प्रक्रियाही सुरु झाली. या निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटींग होईल अशी भिती व्यक्त होत होती परंतु महायुती अंतर्गत भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांनी एकजूटीने मतदान करीत 11 पैकी 10 जागांवरील महायुतीचे उमेदवार पहिल्या पसंतीच्या कोट्यातून निवडून आणले त्यात भारतीय जनता पार्टीचे पाच,राष्ट्रवादी काँगे्रसचे दोन व शिवसेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी या निवडणूकीत परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विटेकर यांना उमेदवारी बहाल केली अन् पहिल्या पसंती क्रमांकाची 23 मते देवून विटेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

          दरम्यान विटेकर हे गेल्या लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे माघारी फिरले होते. त्याआधीच्या म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणूकीतसुध्दा विटेकर यांचा अवघ्या 40 हजार मतांनी पराभव झाला होता. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी विटेकर यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधित्व देवू असे परभणीतील सभेतून जाहीर केले होते. त्याप्रमाणे विटेकर यांना विधानपरिषद निवडणूकीत निवडून आणून पवार यांनी दिलेला शब्द खरा ठरविला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या