🌟जास्तीत जास्त पात्र लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन परभणी जिल्हा प्रशासनतर्फे करण्यात आले आहे🌟
परभणी (दि.23 जुलै 2024) : राज्यातील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना (60 वर्षे व त्याहून अधिक वय) राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरू करण्यात आली असून, जास्तीत जास्त पात्र लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रा मोफत उपलब्ध करून देणे, हे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे मुख्य उद्दिष्ट असून, या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य तसेच देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील. तीर्थस्थळांची यादी अ व ब प्रमाणे असेल. या योजनंअंतर्गत निर्धारीत तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला योजनेचा एकवेळ लाभ घेता येणार आहे. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ही 30 हजार रुपये राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ.सर्व बाबींचा समावेश असेल. या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
* योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :- लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे. त्याची वयाची 60 वर्षे किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे.
* योजनेसाठी अपात्रता :- या योजनेमध्ये खालील व्यक्ती अपात्र ठरतील. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास, किंवा कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृतीवेतन घेत आहेत, असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र राहतील. कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे.
कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत. चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की क्षयरोग, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इ. अर्जासोबत, ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिका-याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसांपेक्षा जास्त जुने नसावे) जे अर्जदार मागील वर्षांमध्ये लॉटरीत निवडले गेले होते, परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरविले जाणार नाही. अर्जदार प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्ये लपवून अर्ज केला आहे. ज्यामुळे तो /तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर त्याला तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल. या योजनेच्या पात्रता पर निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.
* लाभार्थ्यांची निवड : प्रवाशांची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे केली जाईल. प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल. त्यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल. विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत ड्रॉ) प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100 टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल अर्ज करण्याची प्रक्रिया : योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाईल अॅपद्वारे सेतु सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकांस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध करण्यात आली असून, अर्ज विनामूल्य भरता येणार आहेत. अर्जदाराने स्वतः तिथे उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्या थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल. यासाठी अर्जदाराने परिपूर्ण माहिती सोबत ठेवणे आवश्यक आहे.
* आवश्यक कागदपत्रे :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे ही योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून, लाभार्थ्यांचे आधार कार्ड/रेशनकार्ड असावे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणक, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, (लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र / प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल). सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे/केशरी रेशनकार्डधारक असावा. वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक, या योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, रेल्वे तसेच बस प्रवासासाठी एजन्सी तथा टूरिस्ट कंपन्यांची निवड करणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टूरिस्ट कंपन्यास्तकरीय रेल्वे प्रवासासाठी IRCTC समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांची निवड विहित निविदा प्रक्रियेद्वारे करण्यात येईल. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.......
0 टिप्पण्या