🌟मंगरूळपीर तालुक्यातील ११७ शाळेचे ३७६ शिक्षक,शिक्षिका लागले कामाला🌟
फुलचंद भगत
वाशीम:-एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांवर जिल्हा व तालुका प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी ५ ते २० जुलै या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.त्या निमित्ताने मंगरुळपीर तालुक्यातील ११७ जिल्हा परिषद शाळेचे जवळपास ३७६ शिक्षक, शिक्षिका जोमाने कामाला लागले आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ राज्यात १ एप्रिल २०१० रोजी लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकांस मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. शहरासह परिसरातून मोठ्या प्रमाणात कुटुंबे विविध व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करतात, तसेच अनेक कुटुंबे जिल्ह्यात कामानिमित्त स्थलांतरीत होतात. या स्थलांतरामुळे मुलांच्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणात खंड पडण्याची समस्या निर्माण होताना दिसत आहे. अशा शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करुन त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी व्यापक स्वरुपात सर्वेक्षण राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
* याआधीच्या सर्वेक्षणात शाळाबाह्य विद्यार्थी निरंक...
याआधीच्या वर्षीही शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहिम केली परंतु विद्यार्थी संख्या निरंक होती.परंतु मंगरुळपीर येथील बसस्टॅन्ड परिसरातील झोपड्यामध्ये,मानोरा चौकातील तलाव परिसरात आणी इतर ठिकाणी मुले फिरतांना दिसतात तसेच लहान बालकेही भिक मागत फिरतांना दिसतात.अशा बालकाचा खरच शोध घेवुन शाळेत दाखल आहेत का?किंवा दाखल असतील तर नजीकच्या शाळेत त्यांच्या शिकवण्याची व्यवस्था का केली जात नाही?कागदं काळे करायची काम नको म्हणून हेतुपुरस्सरपणे शाळाबाह्य विद्यार्थी निरंक तर दाखवल्या जात नसतील ना?याचा कसोशीने शोध मुख्य कार्यपालन अधिकार्यांनी घ्यावा अशी मागणी होत आहे.
*वाड्या,वस्त्यांवर सुरु आहे सर्वेक्षण*
शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहिमेनुसार घरोघरी जाऊन शाळबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्या व्यतिरिक्त बसस्थानक,बाजारपेठ, विटभट्या, दगडखाणी, स्थलांतरीत कुटुंबे, सर्व खेडी, गाव, वाडी,रेल्वेस्टेशन,तांडे, पाडे, शेततळे, जंगल, बालगृहे, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन नोदणी करण्याबाबत निर्देश दिले गेले आहेत.
ग.रा.शिंदे,प्रभारी गटशिक्षणाधिकारी,मंगरूळपीर
शाळाबाह्य मुलांच्या विशेष शोध मोहीम अंतर्गत ३ ते ६ वयोगटातील जी बालके एकात्मिक बालविकास योजनेचा लाभ घेत नाहीत, तसेच खाजगी बालवाडी, इंग्रजी माध्यमाचे ज्युनिअर केजी, सिनियर केजीमध्ये जात नाही अशा शाळाबाह्य बालकांचा शोध घेण्यात येणार आहे. याकामी मंगरुळपीर तालुक्यातील जि.प.शाळेचे ३७६ शिक्षक, शिक्षिका परिश्रम घेत आहेत.या कालावधीत नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंगरुळपीरच्या शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला गोंदेवार यांनी केले आहे....
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
0 टिप्पण्या