🌟फ्रेंच राज्यक्रांती प्रारंभ दिन : लोकशाहीची व सामाजिक न्यायाची कल्पना...!


🌟फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे फ्रान्समध्ये इ.स.१७८९ ते १७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ🌟 


विश्‍वबंधुत्व म्हणजे जगामध्ये स्वातंत्र्य व समता यांवर विश्‍वास असणारे व ती तत्त्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक, मग ते कोणत्याही देशांतील असोत ते एकमेकांचे बंधू आहेत. स्वातंत्र्य, समता व विश्‍वबंधुत्व आणि जनतेचे सार्वभौमत्व या कल्पनांचा प्रसार सशस्त्र क्रांतीपूर्वी वैचारीक क्रांती करणाऱ्‍या फ्रेंच तत्ववेत्त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केला होता. क्रांतीने या कल्पना साकार करण्याचा रांगडा धसमुसळेपणाचा रांगडा प्रयत्न केला. क्रांतीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, ते युरोपीय जनतेमुळे नव्हे तर फ्रेंच सैन्यामुळे! सदर वाचनीय व स्फूर्तिदायक संकलित लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी प्रस्तुत करताहेत... संपादक.

          फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे फ्रान्समध्ये इ.स.१७८९ ते इ.स.१७९९ या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित युरोपच्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. जुन्या रूढीगत परंपरा, तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारून दिल्या गेल्या व त्यांच्या जागी समता, नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये अंगिकारली गेली. या काळात मॅान्टेस्क्यू या विचारवंताने सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता. तसेच फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. त्याच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील बुद्धिवादी लोकांवर मोठ्या प्रमाणात पडला होता. जॉ जॅकवेस रुसो यांना फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते. इ.स.१७८९च्या मे महिन्यात भरलेल्या ल एता-जेनेरो अर्थात समाजातील पुरोहित, सरंजामदार महाजन व सामान्यजन अशा तीन इस्टेटींच्या, सर्वसाधारण सभेमधून क्रांतीची ठिणगी पडली. जून महिन्यात तिसऱ्या इस्टेटीने टेनिस कोर्टावर प्रतिज्ञा घेतली; तर जुलै महिन्यात बॅस्तिये किल्ल्याचा पाडाव झाला. ऑगस्ट महिन्यात मानवाच्या व नागरिकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात इतिहासप्रसिद्ध झालेल्या व्हर्सायवरच्या मोर्च्याने राजदरबाराला पॅरिसला परतण्यास भाग पाडले. पुढील काही वर्षे विविध मुक्तिवादी गट आणि परिवर्तनवादी प्रयत्नांना हाणून पाडू पाहणारी दक्षिणपंथी राजसत्ता यांच्यादरम्यान संघर्ष घडतच राहिले.

          क्रांतीचे परिणाम व महत्व- स्वातंत्र्य, समता व विश्‍वबंधुत्व ही तत्वत्रयी वरील क्रांतीकारक सुधारणांची प्रेरणा होती. त्यांच्या जोडीला क्रांतीने जनतेच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली होती. ही तत्वत्रयी क्रांतीच्या काळात सार्वजनिक इमारतींवर झळकत असे. नेपोलियनने हुकूमशाही प्रस्थापित केल्यावरही ती शब्दावली न पुसता तशीच ठेवण्यात आली. स्वातंत्र्यामध्ये भाषण, लेखन, प्रकाशन तसेच धार्मिक आणि खाजगी मालमत्तेचे स्वातंत्र्य ह्या गोष्टी अभिप्रेत होत्या. समतेमध्ये सरदारवर्गाची व तिच्यामधील खास अधिकारांची समाप्ती, सर्व नागरिकांस वर्गनिरपेक्ष समान संधी व कायद्याच्या बाबतीत समानता या गोष्टी अंतर्भूत होत्या. विश्‍वबंधुत्व म्हणजे जगामध्ये स्वातंत्र्य व समता यांवर विश्‍वास असणारे व ती तत्त्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक, मग ते कोणत्याही देशांतील असोत ते एकमेकांचे बंधू आहेत. स्वातंत्र्य, समता व विश्‍वबंधुत्व आणि जनतेचे सार्वभौमत्व या कल्पनांचा प्रसार सशस्त्र क्रांतीपूर्वी वैचारीक क्रांती करणाऱ्‍या फ्रेंच तत्ववेत्त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केला होता. क्रांतीने या कल्पना साकार करण्याचा रांगडा धसमुसळेपणाचा रांगडा प्रयत्न केला. क्रांतीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, ते युरोपीय जनतेमुळे नव्हे तर फ्रेंच सैन्यामुळे! फ्रान्सबाहेर क्रांती मानली न जाता लादली गेली होती. तत्त्वापेक्षा परिस्थितीच्या गरजेचा प्रभाव त्यांच्या कृतीवर जास्त पडला होता. सामाजिक समतेवर अशा प्रकारच्या लोकशाहीची व सामाजिक न्यायाची कल्पना यूरोपीय विचारांमध्ये कायमची दृढमूल झाली. पुढील इतिहासावरून ही कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे प्रयत्न युरोपात व अन्यत्र झालेले दिसून येतात आणि आधुनिक युगातही ते पुढे चालू आहेत. तसेच या काळात गरजेच्या पोटी किंमतीवर नियंत्रण आणणे, खासगी मालमत्ता ताब्यात घेणे, यांसारख्या ज्या काही गोष्टी क्रांतिकालीन शासनांना कराव्या लागल्या त्यांमधून काही विचारवंतांना समष्टिवादाची प्रेरणा मिळाली.

              क्रांतीकारकांचे बंधुत्व व आंतरराष्ट्रीय एकात्मता जगाच्या निदर्शनास आणण्यासाठी फ्रेंच नेता लाफायेत याने बॅस्तिलच्या किल्ल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यास देण्यासाठी इंग्लिश क्रांतीकारक टॉमस पेन याच्या हवाली केल्या. टॉमस पेन व जेरेमी बेंथॅम यांस फ्रान्सने नागरिकत्वाचे हक्क दिले. क्रांतीची तत्वे व वरील घटना यांचा विचार करता फ्रेंच राज्यक्रांतीची बैठक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होती, हे लक्षात येते. दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे फ्रान्समध्ये व फ्रेंचांच्या ताब्यातील इतर देशांत राष्ट्रीयत्वाती भावना निर्माण झाली राष्ट्रवादास प्रोत्साहन मिळाले आणि विसाव्या शतकातील राजकीय जागृतीवरही तिचा परिणाम झाला. क्रांतीकारक फौजांनी परक्या राजघराण्यास हाकलून लावले खरे पण क्रांतीचा प्रसार करण्यास निघालेल्या फ्रेंच फौजांमध्ये उत्तरोत्तर स्वार्थी व आक्रमक स्वरूपाचा राष्ट्रवाद संचारला व त्याची प्रतिक्रिया म्हणून विरोधक देशातील लोकांमध्ये स्वत्वाची म्हणजेच राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. विशेषतः पुढे नेपोलियनच्या काळात ही भावना प्रखर झालेली आढळते. फ्रेंच राष्ट्राच्या यशासाठी व नेपोलियनच्या इभ्रतीसाठी आपणास करभार सहन करावा लागावा, हे स्पेन, हॉलंड, ऑस्ट्रिया यांसारख्या देशांतील लोकांस मानहानीचे वाटू लागले. अन्यायाच्या व अपमानाच्या जाणिवेतून राष्ट्रीय भावनेने उसळी घेतली. शासन स्थापणे हे नवे ध्येय निर्माण झाले. युरोपातील जुनी सामाजिक व राजकीय धडी विसकटल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास इटली व जर्मनी यांची एकीकरणाची चळवळ सुरू होण्यास क्रांतीने गती मिळाली. अशा प्रकारे अभावितपणे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे यूरोपातील राष्ट्रवादास स्फूर्ती मिळाली व एकोणिसाव्या शतकात या राष्ट्रवादी चळवळी फोफावल्या.

           फ्रेंच क्रांतीचे मूल्यमापन आधूनिक विचारवंत अनेक प्रकारे करतात, परंतु क्रांतीच्या उद्दिष्टांपेक्षा तिची परंपरा व्यापक आहे. तीमध्ये क्रांतिकारी प्रक्रियेची अधिमान्यता, क्रांतीच्या मार्गाने मोठे उद्देश गाठण्याची शक्यता, क्रांतिगर्भ प्रचार आणि कृती ही अधिमान्य राजकीय साधने व आशय आहेत. क्रांतीने राजकीय कृतीचा धडा युरोपीय जनतेला दिला. या सामूहिक अनुभवातून क्रांतीची संकल्पना व सिद्धांत निघाले. विद्यमान परिस्थिती बदलून जीवन अधिक प्रगतीशील करण्यासाठी झगडणारा मानव, हा इतिहासामध्ये स्फूर्तिस्थाने शोधण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. त्यास निष्ठेच्या, त्यागाच्या व हौतात्म्याच्या उदाहरणांनी खच्चून भरलेली फ्रेंच राज्यक्रांती निःसंशय स्फूर्तिदायक ठरेल.

!! फ्रेंच राज्यक्रांती दिनाच्या सर्वांना स्फूर्तिदायक हार्दिक शुभेच्छा जी !

                  - संकलन व सुलेखन -

                  श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरूजी.

                  रामनगर वॉर्ड, गडचिरोली, जि.गडचिरोली.

                 फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या