🌟परभणी जिल्ह्यात मतदार नोंदणी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु.....!


🌟जास्तीत जास्त मतदारांनी नावनोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले🌟 

परभणी (दि.25 जुलै 2024) : परभणी जिल्ह्यात भारत निवडणूक आयोगाचा सुधारित मतदार नोंदणीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 निवडणूक विभागाकडून राबविण्यात येत असून, जास्तीत जास्त मतदारांनी नावनोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडील 24 जुलै 2024 च्या पत्रान्वये दि. 1 ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2024 राबविण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम परभणी जिल्ह्यातील 95-जिंतूर, 96- परभणी, 97-गंगाखेड आणि 98-पाथरी उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर राबविण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या‍ निर्देशानुसार 1 ऑक्टोबर 2024 या अर्हत्ता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेगवेगळे टप्पे आहेत. पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पूर्व-तयारीचा कालावधी हा मंगळवार दि. 25 जून ते 1 ऑगस्ट 2024 असा असून, एकत्रिकृत प्रारुप मतदार यादी शुक्रवार दि. 2 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर दावे किंवा हरकती नोंदविण्याचा कालावधी हा शुक्रवार दि. 2 ते 16 ऑगस्ट 2024 असा राहणार असून, विशेष मोहिमांचा कालावधी हा 3 व 4 आणि 10 व 11 ऑगस्ट 2024 असा असेल. 

सोमवार, दि. 26 ऑगस्ट 2024 पर्यंत दावे व हरकती निकालात काढून ही यादी अंतिम प्रसिद्धीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी मागणे आणि डाटाबेस अद्ययावत करून पुरवणी याद्यांची छपाई करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या