🌟मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सहभाग नोंदवा : महसूल सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन......!


🌟नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाअभावी बहुतांश तरुणांना रोजगार मिळत नाही🌟

परभणी (दि.30 जुलै 2024) : राज्यात 18 ते 30 वयोगटातील तरुणांची संख्या 2.35 कोटी आहे. यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुभवाअभावी बहुतांश तरुणांना रोजगार मिळत नाही. यासाठी युवकाला त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची समता वाढविण्यासाठी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने हाती घेतली आहे.

जिल्ह्यात दि. 1 ते 7 ऑगस्ट, 2024 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दि. 02 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासनाच्या विविध कार्यालयातंर्गत विविध पदांच्या इंटर्नशिपसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, शहर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, एस.टी महामंडळ, विद्युत वितरण कंपनी, शासकीय रुग्णालये, शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महावि‌द्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खाजगी महावि‌द्यालय, राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका इ. कार्यालयामध्ये लिपिक,ऑफीस सहायक, ऑपरेटर, शिपाई, परिचर, सफाई कामगार,स्वच्छता निरीक्षक,वार्ड बॉय, तलाठी सहायक सिक्युरिटी गार्ड, स्वयंपाकी, वार्डन,माळी,बागकाम इ. प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 35 दरम्यान असावे. तसेच उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवीधर असावा. यामध्ये 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 6, आयटीआय, पदविका उमेदवारांसाठी 8 हजार व पदवीधर उमेदवारांसाठी 10 हजार रुपये इतके मासिक विद्यावेतन 6 महिन्यांपर्यंत देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराकडे तहसीलदाराचे रहिवासी प्रमाणपत्र, आधारकार्ड, शैक्षणिक पुराव्यादाखल टी.सी. व प्रमाणपत्र आणि आधारला सलग्न बँकेचे अकाउंट असणे आवश्यक आहे. या योजनेत स्त्री-पुरुष व इतर हे सहभागी होवू शकतात. सदरील कार्यक्रमात जास्तीत जास्त सुशिक्षित गरजू उमेदवारांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी  रघुनाथ गावडे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या