लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीसाठी रवाना झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांची आजची दिल्लीवारी ही संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसा आधीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दिल्लीला जाऊन आले होते. तर त्या आधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही तासांसाठी दिल्ली वारी केली होती. एकीकडे राज्यात सुरू असलेले मराठा ओबीसी वाद आणि जातीय समीकरण जोपासत विभागनिहाय मंत्रिमंडळ विस्तारावर भर असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात परत एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असल्याची शक्यता आहे.
* राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे ?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार 10 जुलै रोजी काही तासांसाठी दिल्लीला गेले होते. ते एका कृषी सन्मान सोहळ्यासाठी दिल्लीला गेले असले तरी यावेळी त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी होणाऱ्या गाठीभेटींकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दिल्लीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तब्बल अडीच तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. याचवेळेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेट घेत मंत्रिमंडळ विस्तारबाबत गुप्तं खलबतं केल्याची चर्चा आहे. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या निकाल आल्या आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिल्लीवारी करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या .त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीवारी केली आहे. आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावरुन दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
* दोन वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या करण्याची शक्यता
महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे......
✍️मोहन चौकेकर
0 टिप्पण्या