🌟क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद जयंती विशेष : चंद्रशेखर आझाद: भारताचे वीर सुपुत्र.....!!

 


🌟चंद्रशेखरजी एक महान युवा क्रांतिकारी,ज्यांनी भारताच्या रक्षणाकरीता आपल्या प्राणांची आहुती दिली🌟

आपल्या मातृभूमीची दुर्दशा पाहून जर तुमचे रक्त सळसळत नसेल तर ते रक्त नव्हे, पाणी आहे… अगदी बालवयातच चंद्रशेखर आझाद यांच्यात देशभक्तीची भावना ओतप्रोत भरलेली होती. भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे अमुल्य योगदान आहे. क्रांतिकारकांचे स्मरण जेंव्हाही केले जाते तेंव्हा सर्वप्रथम चंद्रशेखर आझाद यांचे स्मरण होते. शक्तिशाली व्यक्तीमत्वांचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येते चंद्रशेखरजी आझाद यांचे व्यक्तिमत्व. रोचक माहिती वाचा, श्री कृ. गो. निकोडे- कृगोनि यांच्या शब्दशैलीत... संपादक.

         चंद्रशेखरजी एक महान युवा क्रांतिकारी,ज्यांनी भारताच्या रक्षणाकरीता आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद आपल्या देशाचे वीर सुपुत्र होते, आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. 

      "आओ झुक कर सलाम करे उनको,

       जिनके हिस्से में ये मुकाम आता है!

       खुशनसीब होते है वो लोग,

       जिनका लहू इस देश के काम आता है!!"

     चंद्रशेखर आझाद यांचा जन्म दि.२३ जुलै १९०६ रोजी मध्यप्रदेशातील भाभरा गावी झाला. चंद्रशेखर सिताराम तिवारी  असे त्यांचे मूळ नाव होते. त्यांचे वडील अत्यंत प्रामाणिक, स्वाभिमानी आणि दयाळू वृत्तीचे होते. दुष्काळ पडल्याने आपले बदरका हे मूळ गाव सोडून आपल्या कुटुंबासह ते भाभरा या गावी स्थायिक झाले. भिल्ल वस्तीत त्यांचे बालपण गेल्याने त्या मुलांसारखे त्यांना देखील धनुष्यबाण उत्तम रीतीने चालवता येऊ लागले. बालपणापासून विद्रोही स्वभावामुळे त्यांचे मन काही अभ्यासात रमले नाही. खेळणे मात्र त्यांना फार आवडे. त्यांना आणि त्यांचा भाऊ सुखदेवला शिकविण्यासाठी त्यांच्या वडिलांचे मित्र मनोहरलाल त्रिवेदी घरी येत असत. त्यांच्या आईला त्यांना संस्कृतचा विद्वान बनविण्याची इच्छा होती, त्यामुळे त्यांना संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथील काशी विद्यापीठात पाठविण्यात आले.

        महात्मा गांधीजींच्या असहकार आंदोलनात आझाद यांचा खुप मोठा सहभाग राहिला होता. गांधीजींनी सन १९२१ साली असहकार आंदोलनाची घोषणा केली. त्यावेळी चंद्रशेखरजी केवळ पंधरा वर्षांचे होते. अगदी तेंव्हापासून त्यांच्यात देशभक्तीची भावना उचंबळत असल्याने ते गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी झाले. परिणामी त्यांना कैद करण्यात आले. न्यायालयात न्यायाधीशांनी नाव विचारल्यावर त्यांनी आझाद असे सांगितले, वडीलांचे नाव स्वतंत्र आणि निवासस्थान तुरुंग सांगितले होते. आझादच्या उत्तराने न्यायाधीश संतापले आणि त्यांनी पंधरा फटक्यांची शिक्षा सुनावली. आपल्या निश्चयावर ठाम राहणाऱ्या आझादने शिक्षा सहन केली. प्रत्येक फटक्यानिशी भारत माता की जय! असा नारा दिला. या घटनेनंतर चंद्रशेखर तिवारी हे आझाद नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील कार्यकर्तृत्वाचा महत्वपूर्ण उल्लेख  इतिहासात आढळतो. सन १९२२ साली गांधीजींनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढून टाकले. त्याचे आझाद यांना फार वाईट वाटले. त्यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वतंत्र करण्याची शपथ घेतली. पुढे त्यांची भेट हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली. ही एक क्रांतिकारी संस्था होती, यात सर्वांचा अधिकार समान होता आणि कुणाशीही भेदभाव केला जात नव्हता. या गोष्टीमुळे आझाद फार प्रभावित झाले. त्यांच्या नेतृत्वात या संस्थेनी इंग्रजांच्या तिजोऱ्या लुटून संस्थेकरीता निधी गोळा केला. सन १९२५ साली त्यांनी तडीस नेलेल्या काकोरी कांडाची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. संस्थेच्या एकूण दहा सदस्यांनी इंग्रजांचा खजिना जात असलेल्या काकोरी ट्रेनला लुटून इंग्रजांपुढे तगडे आव्हान उभे केले होते. काकोरी प्रकरणात चंद्रशेखर आझाद यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. याशिवाय महान क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खां, राजेंद्र नाथ लाहिडी तथा ठाकूर रोशन सिंह यांना या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

   चंद्रशेखर आझाद यांच्यापुढे पुन्हा नव्याने संस्थेला उभारी देण्याचे आव्हान उभे राहिले. ओजस्वी, विद्रोही आणि तापट स्वभावाचे चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन दिल्लीला निघून गेले. त्याठिकाणी त्यांनी क्रांतीकारकांची एक सभा आयोजित केली. तेथे त्यांची भेट भगतसिंग यांच्याशी झाली. हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनने पुन्हा एकदा क्रांतिकारी आणि गुन्हेगारी मार्गांचा अवलंब केल्याने इंग्रज चंद्रशेखर आझाद यांच्या मागावर होते. आझाद यांनी लाला लजपत राय यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी सन १९२८ साली सॉन्डर्सची हत्या केली. चंद्रशेखर आझाद म्हणायचे, की संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही! पुढे इंग्रजांच्या असेम्ब्लीत बॉम्ब फोडण्याच्या घटनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांना पुरेपूर मदत केली. भगत सिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी देखील आझाद यांनी खुप प्रयत्न केलेत, परंतु इंग्रजांच्या सैन्य बलापुढे त्यांचा नाईलाज झाला. नेहमीप्रमाणे इंग्रजांना चकमा देण्यात ते यावेळीही यशस्वी ठरले. चंद्रशेखरजी म्हणायचे, की ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत देशासाठी शत्रूशी लढत राहतील. मरेपर्यंत इंग्रजांच्या हाती न लागण्याची त्यांनी शपथ घेतली होती, ती त्यांनी पाळली. ते आपल्या नावाप्रमाणे शेवटपर्यंत आझाद राहिले आणि देशाकरता प्राणाची आहुती दिली. चंद्रशेखरजी आझाद हे एक महान क्रांतिकारी होते. आपल्यातील देशभक्तीची भावना व अद्वितीय साहसाने त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. त्यांनी अनेक लोकांना या आंदोलनात सहभागी होण्याकरता प्रेरित केले. मातृभूमीच्या या महान सुपुत्राने आपल्यातील शौर्याच्या बळावर काकोरी ट्रेन लुटली आणि वाइसरायच्या ट्रेनला उडवण्याचा देखील प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर महान क्रांतिकारी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी सॉन्डर्स या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. शिवाय भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यासमवेत हिंदुस्तान समाजवादी प्रजातंत्र सभेची स्थापना केली. चंद्रशेखर आझाद हे भगतसिंगचे सल्लागार होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

        इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. दुसरीकडे चंद्रशेखर आझाद ही शिक्षा कमी करून जन्मठेप व्हावी, यासाठी खुप प्रयत्न करत ते अलाहाबादला आले होते. परंतु याचा सुगावा इंग्रजांना लागल्याने त्यांनी अल्फ्रेड पार्कमध्ये चारी बाजूंनी त्यांना घेरले. दोन्ही बाजूंनी चकमक आणि गोळीबार सुरु झाला, एक क्षण असा आला की आझादांच्या बंदुकीत केवळ एक गोळी उरली होती. त्यांना परिस्थितीचा अंदाज आला होता, त्यामुळे इंग्रजांच्या हातून मरण्यापेक्षा त्यांनी स्वतःवर गोळी झाडणे पसंत केले. अशा प्रकारे दि.२७ फेब्रुवारी १९३१ रोजी भारतमातेचा वीर सुपुत्र अमर झाला आणि त्यांची अमरगाथा इतिहासाच्या पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेली.

 !! जयंती निमित्त या महान क्रांतीकारकाला दंडवत प्रणाम !!

               कृगोनि- कृ. गो. निकोडे, से.नि.प्राथ.शिक्षक.

                      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, 

                     रामनगर-गडचिरोली, ७७७५०४१०८६.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या