🌟शिवछत्रपतींच्या शिवप्रतापाचे साक्षीदार असलेल्या वाघनखांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न🌟
शिवछत्रपतींच्या शिवप्रतापाचे साक्षीदार असलेल्या वाघनखांच्या दालनाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील उपस्थित होते लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात आली असून साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यानंतर मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथील संग्रहालयातील इतिहास प्रेमींना ती पाहण्याची संधी मिळणार आहे. सातारा शहरासाठी आजचा क्षण अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींच्या राजधानीला यानिमित्ताने हा मान देण्यात आला.
यावेळी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागाने प्रकाशित केलेल्या 'शिवशौर्यगाथा' या विशेष पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच भारतीय डाक विभागाच्या वतीने किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग, शिवछत्रपतींची राजमुद्रा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम अशी भक्ती आणि शक्तीचा सुरेख संगम असलेल्या विशेष टपाल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी बोलताना, छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून त्यासाठी प्रत्येक योजना सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी करत असल्याचे नमूद केले. छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य असून त्यासाठी अनेक गडकिल्ल्यांच्या जतन संवर्धनासाठी निधी दिला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रतापगड विकास प्राधिकरण स्थापन करून गडाचे जुने वैभव परत आणण्यासाठी १५० कोटींची तरतूद करत असल्याचे यावेळी जाहीर केले. तसेच सातारा जिल्ह्यातील राणी ताराबाईंच्या समधीस्थळाचा जीर्णोद्धार करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली.
याप्रसंगी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत, व्हिक्टोरिया आणि अलबर्ट म्युझियमचे प्रतिनिधी निकोलस मर्चंट, पोस्टमास्टर जनरल किशनकुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच हजारो शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.......
0 टिप्पण्या