🌟वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक संपन्न🌟
फुलचंद भगत
वाशिम:- शेतकरी बांधवांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये यासाठी त्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी, आरोग्य, सिंचन, शिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी जुलै अखेरपर्यंत करावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांनी आज दिले.
राजे वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरखे ,महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एस एस सावरकर , जिल्हा प्रशासन अधिकारी निलेश गायकवाड , जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.एस.जे.अहीरे यांच्यासह विवीध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲड. हेलोंडे म्हणाले की, पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींसह पशुसंवर्धन विभागाने कृतीशील कार्यक्रम राबवावा. जिल्ह्यात गायरान जमीनीवर चारा लागवडीसाठी जिल्ह्यात गावांची निवड करावी. अल्पभूधारकाला चारा उत्पादनासाठी जमीन राखणे शक्य नाही. निवड झालेल्या गावात गायरान जमीनी निश्चित कराव्यात. या महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.पुढे ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी, सिंचन, पशुसंवर्धन, शिक्षण, पूरक व्यवसाय यासंबंधीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. प्रेरणा प्रकल्पात शेतक-यांचे समुपदेशन करण्यात येते. मात्र, केवळ समुपदेशनापुरते मर्यादित न राहता आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार मिळवून देण्याची कार्यवाहीही व्हावी. तणावमुक्ती शिबिराबरोबरच वैद्यकीय शिबिरेही घ्यावीत. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके वितरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पिक विमा प्रतिनिधीचे नाव, मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचे निर्देश दिले. पिकांच्या हमीभावाचे फलक सुध्दा लावावेत. प्रलंबित कामांचा पाठपुरावा शासनस्तरावर करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील चिया उत्पादनाची माहिती बुवनेश्वरी एस यांनी दिली. जिल्हाधिकारी म्हणाल्या, जिल्ह्यातील सर्व यंत्रणा शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी सुखी समाधानी राहील अशी ग्वाही श्रीम. बुवनेश्वरी यांनी यावेळी दिली. सिंचन विहीरींचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अशी माहिती श्री वाघमारे यांनी दिली.
कृषि विभागामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.शाहा यांनी दिली. आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती श्री.कावरखे यांनी दिली.कौशल्य विकास योजनांची माहिती ग्रामपंचायत कार्यालय येथे द्यावे असे सांगितले.गाव तेथे गोदाम या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना झाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांमधील वजन काट्याचे प्रमाणिकरण करावे असे निर्देश संबंधितांना दिले.
शेतमालाला योग्य भाव मिळत नसला तरी शेतमाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. कलमाबांधण्याचे प्रशिक्षण, जेसीबी चालवण्याचे प्रशिक्षण, बोअर मशिनचे प्रशिक्षण, हार्वेस्टरचे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्ह्यात करण्यात यावे. गावात रोजगार उपलब्ध झाला तर शेतकरी आत्महत्या कमी होतील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी विशेष बाब म्हणून स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तकांची पुर्तता करण्याची विनंती श्री.हेलोंडे यांनी केली.
. ‘महाबीज’कडून सीएसआर फंडातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना टोकन यंत्रांचे मोफत वितरण करण्यात यावेळी श्री .हेलोंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.संचालन व आभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी केले.....
0 टिप्पण्या