🌟परभणी कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने जिंतूर तालुक्यातील मौ.कसर येथे विशेष कापूस प्रकल्पा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न....!


🌟या कार्यक्रमाचे आयोजन परभणी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक अमित तुपे यांनी केले होते🌟

भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडयातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत दि. 22 जुलै 2024 रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कसर ता. जिंतुर जि. परभणी येथे दादा लाड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

मौजे. कसर ता. जिंतुर येथे आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ. उषा सातपुते, तांत्रिक प्रशिक्षक, विशेष कापूस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी कापूस पिकातील दादा लाड लागवड तंत्रज्ञांना विषयी सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढी करता योग्य अंतर, गळ फांदी काढुन टाकणे, शेंडा खुडुन झाडांची उंची पारंपारीक पध्दतीपेक्षा कमी ठेवुन फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनात वाढ होईल या बद्दल मार्गदर्शन केले. गळ फांदी कशी ओळखायची तसेच ती केव्हा व कशी कट करायची या बद्दल प्रात्यक्षिक दिले. गळ फांदी जमिनी जवळ असते, ती शेंडया कडे वाढते व तिला कमी पाते असतात आणि ती गळुन येते, गळ फांदीचे खाड जाड असते व सर्वात महत्वाचे म्हणजे तीच्या पहिल्या कांडयावर पान असते. लागवडी नंतर 30 ते 45 दिवसामध्ये सिकेटर किंवा कटर च्या सहाय्याने खोडापासुन 1 ते 2 इंचावर कट करावी. 

परभणी कृषि विज्ञान केंद्र विशेष कापूस प्रकल्पाचे तांत्रिक प्रशिक्षक कुंडलिक खुपसे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सघन व अति सघन कापुस लागवडी बद्दल माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन परभणी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक अमित तुपे यांनी केले. 

या कार्यक्रमासाठी मोजे. कसर, कोक, वर्णा या गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विकास खोबे तर आभार प्रदर्शन नामदेव काळे यांनी केले..... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या