🌟इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा - उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे


🌟परभणी येथील शिवाजी महाविद्यालयात तालुकास्तरीय जनजागृती मेळावा संपन्न🌟

परभणी (दि.27 ऑगस्ट 2024) : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनेचा विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसह शेवटच्या घटकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांनी केले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती प्रचार आणि प्रसारासाठी शिवाजी महाविद्यालयात तालुकास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. दंडवते, महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके, प्राचार्य बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य एन.एन. राऊत, समाज कल्याण निरीक्षक टि. डी. भराड, श्री. काळे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे म्हणाले इतर मागास बहुजन कल्याण विभागाने विविध नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती वंचित घटकापर्यंत पोहच करून लाभ दिला तरच शासनचा उद्देश सफल होईल. यावेळी प्राचार्य बाळासाहेब जाधव, महिला बालविकास अधिकारी कैलास तिडके, मनपा अति. आयुक्त दंडवते, आर.डी.भोगे, पि.डी.पंजरकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग घटकांसाठी शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती योजना, वसतीगृह, आधार, घरकुल, पायाभूत सुवीधा, सामाजिक योजना, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश, स्पर्धा परिक्षेसाठी महाज्योती व अमृत योजनेसह इतर मागासवर्गीय महामंडळ व वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत लाभासाठी अटी व शर्थीसह माहिती या मेळाव्यात देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक शाम मचाले यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथ दिली.

संयोजीका सहाय्यक संचालक श्रीमती गुट्टे यांनी सर्व योजनांची माहिती आपल्याला कुटुंबात व गावागावात पोहचवावी असे सांगून वयोश्री योजनेत 65 वर्ष व त्यापुढील वयांच्या नागरीकांना चष्मा, व्हिल चेअर, सह विविध उपकरणासाठी तीन हजार रूपये अनुदान योजनेचा लाभ प्रत्येक पात्र जेष्ठ नागरीकांना होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे याशिवाय मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजनेसाठी 60 वर्ष व त्यापुढील वयोवृद्ध यांनी ऑनलाईन अर्ज भरुन 30 हजार रूपये अनुदान रोजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या माहीती पुस्तीकेचे विमोचन करून या माहीती पुस्तीकेचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले तर जि.एन भुसारे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वितेसाठी इतर बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचारी व आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या