🌟ध्वज संहितेचे काटेकोर पालन करावे🌟
परभणी (दि.09 ऑगस्ट 2024) : स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहीम आजपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रीय सहभागी व्हावे, तसेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त यावर्षीही दि. 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने 9 उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत आज शुक्रवार, दि. 9 ते 15 ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रत्येक घरावर दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. प्रत्येक गाव, शहरामध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा यासाठी पोस्ट ऑफिस, खादी ग्रामोद्योग, खाजगी आस्थापना, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा, शहरातील महत्वाच्या शासकीय इमारतीवर तिरंगा रोषणाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबतच्या तरतुदी केल्या आहेत. राष्ट्रध्वज हा हँण्डस्पून आणि हस्तनिर्मित वूल, कॉटन, सिल्क आदीचा असावा. याव्यतिरिक्त प्लास्टिक किंवा इतर वस्तूपासून निर्मित राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा आकार आयाताकृती असावा, त्याची लांबी व रुंदीचे प्रमाण 3:2 असावे. राष्ट्रध्वजाचा आकार 9 प्रकारात असावा. त्याचा आकारानुसार लांबी व रुंदी दिली आहे. प्रकार 1 - लांबी, रुंदी अनुक्रमे 6300 व 4200 मीमी, प्रकार 2 – लांबी व रुंदी अनुक्रमे 3600 व 2400, प्रकार 3 - लांबी, रुंदी अनुक्रमे 2700 व 1800, प्रकार 4 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1800 व 1200, प्रकार 5 - लांबी, रुंदी अनुक्रमे 1350 व 900, प्रकार 6 - लांबी, रुंदी अनुक्रमे 900 व 600, प्रकार 7- लांबी, रुंदी अनुक्रमे 450 व 300, प्रकार 8- लांबी, रुंदी अनुक्रमे 225 व 150, प्रकार 9 - लांबी, रुंदी अनुक्रमे 150 व 100 मि.मी. असावी.
राष्ट्रध्वजासाठी वेलस्पून, राकेश दौडडियाल 9818509875, ग्रासिम इंडस्ट्रीज, उदय खाडीलकर 8422969992, अनिरत कॉन्ट्रॅक्ट प्रायव्हेट लिमीटेड, कबीर कुमार 8800265779, 8377885588, आलोक इंडस्ट्रीज, नागेंद्र भुत्रा 9930306145, शाही इक्सपोर्ट सुनील वझीरानी 9818146457, कस्तुरी एंटरप्रायजेस, विजयभाई कस्तुरी 9924984410, सस्टेन फॅब एंटरप्रायजेस, अमित मांजरेकर 9820515598, मेंड्रो कॉर्पोरेशन, अरुण गोपाल 7210273000 यांच्याशी संपर्क साधावा.
राष्ट्रीय सणावेळी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. भारतीय ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा वापर करताना खराब झालेले, माती लागलेल्या ध्वजाची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. उपयोगात आणलेले ध्वज सन्मानपूर्वक जतन करावे किंवा शासकीय यंत्रणांना सोपवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी केले आहे.....
0 टिप्पण्या