🌟परभणी जिल्ह्यातील मतदार नाव नोंदणीसाठी अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


🌟निवडणूक विषयक कामकाजाच्या पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी आढावा घेतला🌟

परभणी (दि.09 ऑगस्ट 2024) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदार नावनोंदणीच्या दिवशी मतदान केंद्रनिहाय तपासणी करण्यासोबतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदार नावनोंदणी, नाव वगळणी, साहित्य तपासणी, इव्हीएम मशीन निवडणुकीबाबतचे प्रशिक्षण आदी कामे मिशन मोडवर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज येथे दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकविषयक कामकाजाच्या पूर्वतयारीचा आज जिल्हाधिकारी श्री.गावडे यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी, संगीता सानप यांच्यासह सर्व तहसीलदार, एनआयसीचे सुनील पोटेकर आदी उपस्थित होते. 

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ती यादी ग्रामपंचायत आणि शहरी भागात सर्व स्तरावर प्रकाशित करावी. ती सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी आणि मतदारांपर्यंत पोहचली असल्याची खात्री करून घ्यावी. निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेऊन त्यांच्यावर सोपविण्यात येणाऱ्या जबाबदारीची माहिती करून द्यावी. येत्या 10, 11 आणि 17, 18 ऑगस्ट रोजी मतदार नावनोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदार नावनोंदणी केंद्रावर नावनोंदणी वेळी प्रत्यक्ष भेट द्यावी. तसेच मतदार नावनोंदणी केंद्र अधिकारी-कर्मचाऱ्याला अथवा मतदाराला नावनोंदणी करताना येत असलेल्या अडचणी तात्काळ सोडविण्यास मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले. 

मतदार नावनोंदणी करताना मतदारांचे प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढावेत. तसेच निवडणूक कामी असलेले तलाठी, कोतवाल, कार्यालयीन कर्मचारी मतदार नावनोंदणी प्रक्रियेत उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी. मतदार यादी, नमुना क्रमांक 6 आणि इतर प्रलंबित प्रकरणे निकाली काढताना अधिक काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिल्या तसेच निर्धारित वेळेत मतदार नावनोंदणी करून घ्यावी. या प्रक्रियेमध्ये प्रशिक्षण देताना ब्रेल आणि मास्टर ट्रेनरची संख्या वाढवावी. तसेच या प्रक्रियेमदरम्यान टपाली मतदान, गृहभेटी मतदान, निवडणूक साहित्याचे वितरण व स्वीकृती आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यास सांगितले. विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष बोलावून घेऊन केलेल्या कार्यवाहीचा तपशील दाखवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या