🌟कंठेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्या अठरा गावांतील रुग्णांना करावे लागते मृत्यू मार्गावरुन मार्गक्रमण....!


🌟मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अद्यापही कागदोपत्री प्रशासकीय कारभार मात्र दळभद्री🌟

🌟पुर्णा तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक गावांतील मुख्य मार्गांची भयावह अवस्था🌟


पुर्णा (विशेष वृत्त - चौधरी दिनेश) :- पुर्णा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता असे निदर्शनास येते की भ्रष्ट नौकरशहा बेईमान गुत्तेदार आणि संधीसाधू लोकप्रतिनिधींनी विकासाला अक्षरशः बगल देत विकासाच्या नावावर शासकीय विकासनिधी गिळकृत करण्याचा कुटीर उद्योग आरंभला की काय ? पुर्णा तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागांतील मुख्य रस्त्यांची झालेली भयावह अवस्था पाहता असे वाटते की देशाला इंग्रजांच्या बेबंदशाही राजवटीतून स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष आणि मराठवाड्याला निजामाच्या अत्याचारी राजवटीतून स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतर देखील ग्रामीण भागातील जनतेच्या नशिबी दैनाच असून ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत नागरी सुविधांपासून अद्यापही वंचितच राहावे लागत आहे.


पुर्णा तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज देखील मुख्य रस्त्याची परिस्थिती बघितल्यास यावर विश्वास बसत नाही की सदरील रस्ता हा गावाला जोडणारा मुख्य रस्ता आहे की शेत शिवारातील 'पांदन रस्ता' अशीच अवस्था तालुक्यातील कंठेश्वर येथील मुख्य रस्त्याची देखील झाली असून या गावात पुर्णा-गोदावरी नदीचे पवित्र संगम व त्या संगमावर पवित्र तिर्थक्षेत्र कोटेश्वर महादेव मंदिर तर आहेच याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास अठरा गावांतील लोकांच्या आरोग्य सुविधेसाठी प्रशासनाने या गावात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र देखील उभारले आहे अश्या या गावासह गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याला अक्षरशः पांदन रस्त्याचे स्वरूप आले असून राज्य सरकारने ग्रामीण भागांतील रस्त्यांचा विकास व्हावा याकरिता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तर केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यान्वित केली तरी देखील अनेक गावांतील मुख्य रस्ते दुरुस्त नसल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आपला जिव धोक्यात घालून या रस्त्यांवरून मार्गक्रमण करावे लागते कंठेश्वर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी सातेगाव,सारंगी,मिठापूर,अजदापूर,भाटेगाव,धनगर टाकळी, पिंपळगाव लिखा,सोन्ना,गौर,नरापूर,आडगाव,गोविंदपूर,चुडावा,मरसूळ अश्या जवळपास अठरा गावांतील लोक येतात परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी किंवा प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांना अक्षरशः मृत्यूच्या मार्गावरून जिव धोक्यात घालून मार्गक्रमण करावा लागत असतांना प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील कुंभकर्णी झोपेत आहेत की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून मागील जवळपास चार ते पाच वर्षांपासून धनगर टाकळी ते कंठेश्वर या मुख्य रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू असून अद्यापही हे पुर्णत्वास गेले नसल्यामुळे या रस्त्याची दैना थांबता थांबत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या