🌟धाराशिवची पत्रकारिता : गतवैभव,वर्तमान आव्हान.....!


🌟दर्जेदार पत्रकारितेची जागा काही प्रमाणात 'बदमाश' पत्रकारांनी घेतली आहे🌟

✍🏻लेखक :- सुनील ढेपे ज्येष्ठ पत्रकार 

धाराशिव

धारशिव जिल्ह्याच्या पत्रकारितेचा इतिहास हा एका वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाचा आहे. एकेकाळी दर्जेदार आणि प्रभावी पत्रकारांनी या क्षेत्रात आपली अमिट छाप सोडली होती. भारत गजेंद्रगडकर, दिलीप पाठक, बेदमुथा बंधू यांसारख्या पत्रकारांनी केलेले लिखाण हे आजही वाचनीय आहे. त्यांच्या लेखांमधून आणि बातम्यांमधून समाजातील विविध पैलूंचे दर्शन घडत असे त्यांची लेखणी ही समाजाच्या प्रगतीसाठी,अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि सत्याचा आवाज बुलंद करण्यासाठी वाहिलेली होती.

परंतु, काळाच्या ओघात धारशिवच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातही बदल झाले आहेत. दर्जेदार पत्रकारितेची जागा काही प्रमाणात 'बदमाश' पत्रकारांनी घेतली आहे. हे पत्रकार केवळ स्वार्थापोटी, सनसनाटी बातम्या पसरवून, खोट्या बातम्यांचा प्रसार करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे धारशिवच्या पत्रकारितेची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. या बदमाश पत्रकारांच्या कारवायांमुळे धारशिवच्या पत्रकारितेचे भवितव्य धोक्यात आले आहे. 

आजच्या काळात काही पत्रकार आपल्या दर्जेदार लिखाणामुळे मोठे होतात, तर काही पत्रकार चमकोगिरी करून प्रसिद्धी मिळवतात. या दोन्ही प्रकारच्या पत्रकारांचे धारशिवच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात अस्तित्व आहे. परंतु, यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, खरी पत्रकारिता ही केवळ चमकोगिरी करून होत नाही, तर त्यासाठी समर्पण, जिद्द आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी आवश्यक असते.

धारशिवच्या पत्रकारितेला पुन्हा एकदा तिचे गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर दर्जेदार पत्रकारितेला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पत्रकारांनी आपल्या लेखणीचा वापर समाजाच्या हितासाठी करावा. पत्रकारितेच्या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणेही गरजेचे आहे. पत्रकारितेच्या शिक्षणात नैतिक मूल्यांचा समावेश करणे, पत्रकारांना त्यांच्या हक्क आणि कर्तव्यांबद्दल जागरूक करणे आणि त्यांना समाजाच्या ज्वलंत समस्यांवर भाष्य करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

धारशिवच्या पत्रकारितेला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास धारशिवची पत्रकारिता पुन्हा एकदा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासाला सुरुवात करू शकेल. यासाठी समाजानेही पत्रकारितेला पाठिंबा द्यावा, खऱ्या पत्रकारितेचे कौतुक करावे आणि खोट्या बातम्यांचा प्रसार रोखण्यासाठी पुढाकार घ्यावा.

धारशिवच्या पत्रकारितेचे भविष्य हे येत्या पिढीच्या हातात आहे. त्यांनी या क्षेत्रात येऊन दर्जेदार पत्रकारिता करावी, समाजाचे प्रबोधन करावे आणि धारशिवच्या पत्रकारितेला पुन्हा एकदा तिचे गतवैभव प्राप्त करून द्यावे, हीच सदिच्छा! 

✍🏻सुनील ढेपे, ज्येष्ठ पत्रकार धाराशिव

दि. २१ ऑगस्ट २०२४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या