🌟काव्य मैफिलीत शहरातील कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले🌟
सेलू :- सेलू येथील कै.अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कै.रा.ब.गिल्डा सभागृहात रविवार दि.18 ऑगस्ट रोजी आयोजित काव्य मैफिलीत शहरातील कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
माधव गव्हाणे यांनी ‘इंडिया सहज जाऊन पोहोचला मंगळा सहित चंद्रावर, आम्हाला ईतक्या सहज पोहचता येत नाही आरोग्य केंद्रावर’ या आपल्या कवितेतून वास्तव जाणिव करुन दिली. गौतम सूर्यवंशी यांनी ‘धर्म ,पंथ, अन भेद नको, समानता ही हवी एकसंघ या भारताची, ओळख देऊ नवी, भेद सारे विसरूनी, आता समरस होऊ चला’ आपल्या या रचनेतून समताभाव जागविला. अश्विनी - संजय विटेकर या गझलकार दाम्पत्याच्या जुगलबंदीने रसिक श्रोत्यांच्या चेहर्यावर हास्य फुलले.
अश्विनी विटेकर यांनी, ‘तुझ्या आठवांचा पहारा वगैरे, किती गोड हा कोंडमारा वगैरे.’ तर संजय विटेकर यांनी, ‘घेवून टाक आता वापस मिठी तुझी तू, ठेवून मी कुणाचे उपकार घेत नाही.’ ही गझल सादर केली. डॉ. शरद ठाकर यांनी ‘तुझ्या रुपाने पडलमाझ्या नशिबी चांदण.’, डॉ. जयश्री सोन्नेकर यांनी ‘पंथ माझा जातही माहीत नाही, फक्त मी माणूस, याचे भान आहे.’ संध्या फुलपगार यांनी ‘मी कशाला बरे कुणाची चाकरी करावी म्हणते, अर्धीच पण हक्काची भाकरी करावी म्हणते.’ प्रभू शिंदे यांनी, ‘काल आपल्या गावातलं पोरगं मोबाईल खेळत होतं,भलं मोठं आजगर, त्याच्या मांडीवर बसलं होतं.’ सुमिता सबनिस यांनी, ‘पोरावानी जपतोया, जसं पोटचाच पोर, बाप मव्हा रातदिस, कापसाच्या मागम्होर.’ ही कविता सादर केली. तर हरिष कवडे यांनी, ‘मंत्र्याचा लाल दिवा, गाव सार पेटवून गेला, बाप - लेक, चुलते - पुतने, अशी रक्ताची नाती गोठवुन गेला.’ या कवितेतून राजकीय वास्तव मांडले.
कवी डॉ. अशोक पाठक, दिलीप डासाळकर, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, शैलजा वसेकर, करूणा बागले, डॉ. राजाराम झोडगे, संभाजी रोडगे, शुक्राचार्य शिंदे, दिलीप दौड, डॉ. निर्मला पद्मावत, राम गायकवाड यांनी आपल्या कविता सादरीकरणातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. सेलूकर रसिकांनी काव्य मैफिलीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.के.डी. वाघमारे हे होते. काव्य मैफिलीचे उद्घाटन प्रेक्षाताई भांबळे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक काव्य मैफिलीचे आयोजक कै. अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले. काव्य मैफिलीचे बहारदार सुत्रसंचालन कवी सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार कॉ. अशोक उफाडे यांनी मानले. काव्य मैफिल यशस्वीतेसाठी संतोष कुलकर्णी, मोहन बोराडे, किशोर कटारे, संदीप काष्टे, अरविंद लहाने, शिवाजी गजमल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला......
0 टिप्पण्या