🌟परभणी शहरासह जिल्ह्यात सर्वत्र साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रम व प्रतिमांची मिरवणूक🌟
परभणी (दि.01 ऑगस्ट 2024) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती निमित्ताने आज गुरुवार दि.01 ऑगस्ट रोजी सकाळ पासून सायंकाळी उशीरापर्यंत विविध पक्ष,संस्था,संघटना व प्रतिष्ठाणांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी,नागरीकांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.
येथील बसस्थानक परिसरात साहित्यरत्न साठे यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला होता. परंतु, या ठिकाणी साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी संकल्प सोडण्यात आला होता. त्याप्रमाणे साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्नसुध्दा गेल्यावर्षी पूर्ण झाले होते. त्याच परिसरात साठे यांच्या 104 व्या जयंतीदिनी म्हणजे गुरुवारी पूर्णाकृती पुतळ्यासाठी संकल्प केलेल्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर त्या स्वप्नपूर्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. तसेच यावर्षी या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणचा संपूर्ण परिसर सुशोभित करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी स्वागत कमानीसह, रांगोळ्या, विद्युत रोषणाई व सुशोभिकरणाचे काम करण्यात आले. सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत विविध पक्ष, संस्था, संघटना व प्रतिष्ठाने व मंडळांच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य नागरीकांनी या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत भावपूर्ण असे अभिवादन केले.
आमदार सुरेश वरपुडकर, स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, अरविंद देशमुख, सिध्दार्थ हत्तीअंबीरे, गौतम मुंढे, विश्वनाथराव गवारे, गणपत भिसे, मंचक खंदारे, सुनील सुतारे, लहुजी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके, शिवाजी शेळके यांच्यासह शेकडो नेतेमंडळी व पदाधिकार्यांनी अभिवादनाकरीता मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विविध संघटना व संस्थांद्वारे भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत मोठ्या संख्येने पुरुष, महिला व युवक सहभागी झाले होते. फेटेधारी पुरुष, महिला व युवकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी मोटारसायकल रॅलीसुध्दा काढण्यात आली. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह संस्था व प्रतिष्ठानांमधून साठे यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.......
0 टिप्पण्या