🌟राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात नियम धाब्यावर बसून बदल्यांचे सत्र सुरू....!


🌟विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप🌟 

✍️ मोहन चौकेकर  

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागात सरार्स नियम धाब्यावर बसून मोठया प्रमाणात बदल्यांचे सत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियम आणि शासकीय कर्तव्य पर पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या कलम ३(१) मध्ये कोणत्याही अधिकारी यांचा एका पदावर असण्याचा कालावधी ३ वर्षाचा असेल अशी तरतूद आहे. तसेच एका कार्यालयातून किंवा एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली त्यांचे ६ वर्षे पूर्ण झाल्यावर करता येईल, अशी तरतूद आहे. 

या अधिनियमाच्या कलम ४ मध्ये ३ वर्षाचा कालावधी पूर्ण केल्याशिवाय बदली करता येणार नाही. कलम ४ (४) मध्ये अधिकारी कर्मचारी यांच्या बदल्या वर्षातून एकदाच केवळ एप्रिल आणि मे महिन्यात करण्यात येतील अशी तरतूद आहे. मात्र वर्षातील कोणत्याही वेळी बदली करणे आवश्यक असल्यास सक्षम प्राधिकारी यांची खात्री पटली असल्यास आणि लेखी कारणे नमूद करून करता येईल अशी तरतूद आहे. मात्र, महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कोणत्याही कायद्याचे, नियमांचे, सूचनांचे पालन न करताच नियमबाह्य बदल्या झाल्या असून अजूनही करण्यात येत असल्याचे दानवे यांचे म्हणणे आहे.  

भारत निवडणूक आयोगाने ३१ जुलै २०२४ अन्वये जे अधिकारी थेट निवडणूक कामांशी संबंधित आहेत आणि ज्यांना ३१ डिसेंबर २०२४ रोजी मागील ४ वर्षात ३ वर्ष पूर्ण होत आहेत केवळ अशाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच बदली करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची पूर्व मान्यता घेऊनच बदली करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. मात्र, निवडणूक आयोगाच्या निकषात न बसणाऱ्या अधिकाऱ्यांचे देखील सर्रास बदल्या करण्यात आल्या आहेत ज्या अधिकाऱ्यांचा स्वजिल्हा नाही आणि मागील ४ वर्षात ३ वर्ष पूर्ण झाले नाही अशा काही अधिकाऱ्यांच्या त्यांच्या सोईच्या पदावर तर काही अधिकाऱ्यांच्या गैरसोयीच्या पदावर बदल्या करण्यात आल्या आहेत येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत त्यांना मदत होईल, असा दृष्टीकोन ठेवून काही लोकप्रतीधींनी त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या मतदारसंघात बदल्या करून घेतल्या असल्याचा आरोपही दानवे यांनी केला आहे.

कायद्याचे, नियमांचे कोणतेही पालन न करता, सूचनांचे उल्लंघन करून अत्यंत घाई घाईत आणि फार मोठ्या प्रमाणावर  आर्थिक गैरव्यवहार करून बदल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्च स्तरीय समिती मार्फत चौकशी करून बेकायदेशीर करण्यात आलेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. सदर प्रक्रियेत समावेश असलेल्या अधिकाऱ्यांविरुद्ध म.ना.से (शिस्त व अपील) १९७९ अन्वये व निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे निवडणूक नियमांच्या अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व निवडणूक आयोग यांच्याकडे  पत्राद्वारे केली आहे......

 ✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या