🌟जेष्ठ नेते तथा कृषी भुषण कांतराव देशमुख झरीकर यांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी🌟
परभणी :- परभणी जिल्हा नियोजन समितीने रविवार दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी मोठ्या घाईगडबडीने ऑनलाईन घेतलेल्या बैठकीतून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेल्या ४७० कोटी रुपयांच्या कामांची यादी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे व परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसार माध्यमातून जाहीर करावी अशी मागणी कृषीभूषण तथा प्रगतिशील शेतकरी जेष्ठ नेते कांतराव काका देशमुख यांनी केली आहे.
परभणी जिल्हा नियोजन समितीच्या रविवारच्या बैठकीतून वार्षिक योजनेतील ४७० कोटी रुपयांच्या कामांना अक्षरशः चर्चेविना मंजुरी बहाल करण्यात आली, परंतु लोकप्रतिनिधीं व नियोजन समितीचे काही सदस्यांनी बैठकीतून किंवा त्या आधी नेमकी कोणती विकास कामे सुचविली ? ती कामे कोणत्या भागातील आहेत ? त्या कामांची आवश्यकता आहे का ? कामांचे स्वरूप काय? त्या कामांवर किती पैसा खर्च होणार ? व कोणती सरकारी यंत्रणा ती कामे करणार आहे? याबाबत स्पष्टता झालीच पाहिजे असे देशमुख यांनी नमूद केले.शहरी असो ग्रामीण भागातील या कामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना असली पाहिजे, त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून होणाऱ्या या कामांचा सविस्तर तपशीलसुध्दा पालकमंत्री व प्रशासनाने जाहीर केलाच पाहिजे असं ते म्हणाले.
आधीच सर्वार्थाने मागासलेल्या या जिल्ह्यात मूलभूत सुविधांसह अन्य विकास कामांवर पुरेसा निधी उपलब्ध होत नाही,जो काही निधी पदरी पडतो त्या निधीचाही योग्य असा विनियोग होत नाही, थातूरमातूर कामे करीत निधी हडपण्याचा उद्योग या जिल्ह्यात सातत्याने होत राहिला आहे अशी खंत देशमुख यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केलेल्या शिफारशी व केलेल्या कामांबद्दल नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर शंका कुशंका,गंभीर स्वरूपात तक्रारी राहिल्या आहेत, त्या शंका कुशंकांचे कोणीही आजपर्यंत निरसन केले नाही,गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल होऊन सुद्धा यंत्रणेनेही कधी गांभीर्याने चौकशी केली नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट करतेवेळी सुज्ञ नागरिकांनी आता घाईगरबडीने मंजूर केलेल्या ४७० कोटी रुपयांच्या कामांचा सविस्तर तपशील संबंधित यंत्रणाना मागावा, कामांच्या प्रारंभापासून ते काम पुर्ण होईपर्यंत जागरूक राहावे असे मत व्यक्त केले.......
0 टिप्पण्या