🌟परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी सण-उत्सवात अन्नपदार्थ खरेदी करताना खबरदारी घ्यावी....!


🌟अन्न औषध प्रशासनाचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन🌟 

परभणी (दि.06 सप्टेंबर 2024) : गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत विविध सण व उत्सव साजरे होत आहेत. या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद, उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. 

गणेशोत्सव कालावधीत गणेश मंडळांकडून प्रसादाचे वाटप करण्यात येते. गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा-2006 नियम व नियमन-2011 अंतर्गत नोंदणी करावी, तसेच जनतेने अन्न पदार्थाची खरेदी करताना काळजी घ्यावी. गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद हा काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. प्रमादावर धूळ, माती, माशा, मुंग्या या व इतर किटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे, अन्नपदार्थ सेवनास देऊ नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या सर्व व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत. त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत. 

प्रसाद हाताळणाच्या व्यक्तीने वैयक्तिक स्वच्छतेच्या सर्व नियमांची काळजीपूर्वक अंमलबजावणी करावी. नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे, शिंगणे, भुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखूचे सेवन वा धुम्रपान करणे टाळावे. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीची नखे व्यवस्थित कापलेली असावीत. हात पुसण्यासाठी व्यक्तीने हातमोजे व अॅप्रन घालावा हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मडळांनी https://toscos.tssai.gov.in या संकेतस्थळावर जाऊन 100 रुपये शुल्क भरून अन्न व औषध प्रशासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र घ्यावे.

तसेच नागरिकांनी अन्न पदार्थाची खरेदी करताना मिठाईची खरेदी करताना ताजी असल्याची खात्री करावी. खरेदी केलेल्या अन्न पदार्थांचे पक्के बिल घ्यावे. परवानाधारक-नोंदणीधारक पेढीकडूनच अन्न पदार्थाची खरेदी करावी. अनोळखी व्यक्तीकडून खरेदी करू नये. भडक खाद्यरंगाची मिठाई खरेदी करू नये. खवा-माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो 24 तासात करावे. बुरशीयुक्त मिठाई खाऊ नये. उघड्यावरचे अन्नपदार्थ खरेदी करणे टाळावे. पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना बॅच नंबर, बेस्ट बिफोर दिनांक, एक्सपायरी दिनांक तपासून खरेदी करावे. गंजलेले खाद्यतेलाचे टिन खरेदी करू नयेत. पक्के बिल घ्यावे. यानंतरही शंका आल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) यांनी केले आहे...... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या