🌟रेल्वे स्थानकासह संपूर्ण परिसरात प्रवासी महिला वर्गासह रेल्वे अधिकारी/कर्मचारी कुटुंबांसह रेल्वेची मालमत्ताही असुरक्षित🌟
नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत येणारे निजाम व इंग्रज काळातील मराठवाड्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात मोठे जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणारे पुर्णा जंक्शन अवघ्या तिन दशकाच्या अल्पकालावधीत सर्वात संवेदनशील रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाईल यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही परंतु दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे मागील अनेक वर्षांपासून पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक व संपूर्ण रेल्वे परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी अत्यंत सुरक्षित असे आश्रयस्थान झाल्याचे निदर्शनास येत असून या परिसरात मनुष्यरुपी हिंस्र पशुंसह मद्यपी/गंजेटी गर्दुल्ले तसेच नशेडींचा मुक्तसंचार होतांना दिसत असल्यामुळे प्रवासी वर्ग तसेच रेल्वे अधिकारी/कर्मचारी यांच्यासह परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीखाली वावरतांना पहावयास मिळत आहेत.
पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकावरील निजाम/इंग्रज राजवटी पासून कार्यान्वित असलेले लोहमार्ग पोलीस स्थानक सन २००८ यावर्षी नांदेड येथे स्थलांतरित करण्यात आल्यानंतर सुरक्षाव्यवस्थे अभावी बेवारस झालेल्या पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकासह शेकडो एक्करमध्ये पसरलेला संपूर्ण रेल्वे परिसर गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी आश्रयस्थानच झाल्याने या परिसरात गुन्ह्यांवर गुन्ह्यांसह स्थानिक रेल्वे प्रशासनांतर्गत गंभीर घोटाळे देखील होतांना पाहावयास मिळत असून या गंभीर प्रकरणांची दखल घेऊन नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
पुर्णा रेल्वे स्थानकासह रेल्वेच्या मालकीच्या तडीपार परिसर,रेल्वे वसाहतीसह आसपासचा परिसर रेल्वे स्थानक क्रमांक एक मागील आरआरसी ग्राऊंड परिसर,रेल्वे पॉवर हाऊस मागील परिसर,रेल्वे स्थानक क्रमांक चारच्या आसपासचा परिसर आदी परिसरात सातत्याने गंभीर गुन्ह्यांचे प्रकार घडत असतांना रेल्वे सुरक्षा यंत्रणा या गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यात कमकुवत ठरत असून पुर्णा रेल्वे स्थानकांवरुन धावणाऱ्या जवळपास अंदाजे तीस ते पस्तीस प्रवासी रेल्वे गाड्यांतील प्रवाशांसह शेकडों एक्करमध्ये पसरलेल्या कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीच्या सुरक्षेची जवाबदारी लोहमार्ग पोलिस चौकीतील केवळ दोन ते तीन कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीतील बोटावर मोजण्या एवढ्या कर्मचाऱ्यांवर असल्याने सातत्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पुर्णा रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात मागील तीन वर्षांपासून महिलांच्या निर्घृण हत्यांसह महिला/पुरुष प्रवाशांची लुटमार,प्रवासी तसेच व्यापाऱ्यांवर जिवघेणे हल्ले,रेल्वेच्या मालमत्तेची लुट,मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांतील मालाची लुटमार रेल्वे डिझेल डेपोतील डिझेलच्या मोठ्या प्रमाणात सातत्याने होणारी चोरी अर्थात डिझेल घोटाळे,प्रवासी रेल्वे गाड्यांतील एसी कोच मधील साहित्यांची चोरी आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटना एकापाठोपाठ एक अश्या घडत असतांना दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानकासह प्रवासी वर्गाच्या व रेल्वे परिसर व परिसरातील संपत्तीच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या यावर देखील रेल्वे मंत्रालयाने प्रकाशझोत टाकणे आवश्यक आहे.
पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानक व परिसरात घडलेल्या काही गंभीर गुन्ह्यांचा घटनाक्रम :-
* दि.२० सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री ०२-०० ते पहाटे ०४-०० वाजेच्या सुमारास पुर्णा रेल्वे पोलिस चौकीच्या हाकेच्या अंतरावर तडीपार परिसरात हैद्राबाद येथील आरोपी अरबाज खान पठाण याने आपल्या १९ वर्षीय पत्नीची अक्षरशः दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना.
* दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी अजमेर-हैद्राबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन नंबर ८६०४५११४ या गाडीत हिंगोली येथून पुर्णेला येणाऱ्या ३० वर्षीय हृदयास छिद्र असल्याने बायपास सर्जरी झालेल्या गजानन मुंडीक नामक युवकास चार ते पाच जनांच्या टोळक्याने गंभीर मारहान केल्याची घटना.
* हिंगोली जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत दि.०२ मार्च २०२३ रोजी ३८ किलो गांजाची तस्करी केल्या १४ लाख ६५ हजाराचा मुद्देमालासह पुर्णा लोहमार्ग पोलिस चौकीत कार्यरत पोलिस कर्मचारी रविंद्र अमरसिंग राठोडला ताब्यात घेतल्याची घटना.
* दि.२३ मार्च २०२३ रोजी नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या डब्यातील शौचालयात एका ३५ वर्षीय तरुणीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली.
* दि.०९ एप्रिल २०२३ रोजी नांदेड-पुणे एक्सप्रेस मधील बि - ०१ कोच मध्ये पुण्यास जात असलेल्या दोन विद्यार्थ्यांना परभणी येथील एका नगरसेविकेचा पती असलेल्या व्यक्तीने लाथा बुक्यांनी जबर मारहान केल्याची घटना.
* दि.२६ एप्रिल २०२३ रोजी रात्री १०-०० ते १०-३० वाजेच्या सुमारास भारत सरकार असे लिहिलेलेल्या खाजगी आयशर ट्रक क्रमांक ए.पी.२७ डब्लू ६८२९ हा आरआरसी ग्राऊंड येथून तर बोलोरी पिकअप् जिप ज्या वर भारत सरकार असे लिहिलेल्या जिचा क्रमांक एम.एच.२६ बी.ई.१९४८ ही दि.२७ एप्रिल २०२३ रोजी सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन कार्यालया समोरुन चोरट्यां डिझेलसह ताब्यात घेण्यात आल्याची घटना.
* दि.०४ मे २०२३ रोजी सायंकाळी ०६-५० वाजेच्या सुमारास प्लाटफार्म क्रमांक ०४ वरील प्रवेश द्वारालगत मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या लोखंडी रॉड व लाकडी दांडुक्यांनी पुर्णा शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यास गंभीर स्वरुपाची मारहाण करीत धावत्या रेल्वेखाली ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना.
* दि.२९ जानेवारी २०२४ रोजी पुर्णा रेल्वे डिझेल डेपोतील ५ हजार ५०० लिटर डिझेल चोरी करुन नेत असताना दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर येथील वालूर फाटा परिसरातून परभणी जिल्हा स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाकडून डिझेलसह टॅंकर ताब्यात घेऊन रेल्वे डिझेल घोटाळा उघडकीस आणल्याची घटना
* दि.१३ सप्टेंबर ते दि.१४ सप्टेंबर २०२४ घ्या मध्यरात्री पुर्णा-परभणी लोहमार्गालगत महिलेची निर्घृण हत्या करून रेल्वे पॉवर हाऊस मागील मैदानावरील झाडाझुडुपांमध्ये मृतदेह फेकून दिल्याची गंभीर घटना.
अश्या गंभीर गुन्ह्यांच्या घटना पुर्णा रेल्वे स्थानक व रेल्वे परिसरात घडत असल्यामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक निती सरकार यांनी पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या आसपासचा संपूर्ण रेल्वे परिसर प्रथमतः संरक्षण भिंत बांधून संपूर्ण परिसर प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करुन लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांसह रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करावी व लोहमार्ग उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुर्णा जंक्शन स्थानकावर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावी ज्याने करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून व नागरिकांतून होत आहे.......
0 टिप्पण्या