🌟महाराष्ट्र राज्य सरकार राजकोट किल्ल्याजवळ १०० कोटींची शिवसृष्टी उभारणार.....!


🌟‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ प्रकल्प🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

राजकोट येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक पर्यटनासाठी आरक्षित जागेत ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी १०० कोटींचा निधी अपेक्षित असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पात काय असणार, याचे सादरीकरण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर करण्यात आले.

उच्चस्तरीय समितीचे प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडे लवकरच याबाबत सादरीकरण करून मान्यता घेतली जाईल, असे यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आज कुडाळ-मालवण विधानसभेसाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यानंतर मंत्री केसरकर यांच्या सूचनेनुसार या प्रकल्पाचे वास्तूविशारद अमित कामत यांनी सादरीकरण केले. यावेळी त्यांनी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येत आहे. तेथे एकूण शासकीय मालकीची सव्वासहा एकर जागा आहे. ही जागा पर्यटन विकास, गार्डन आणि वाहने पार्किंगसाठी आरक्षित आहे. मालवण नगरपरिषदेच्या ताब्यात ही जमीन आहे. त्यामुळे प्रकल्प उभारण्यासाठी जागेची अडचण येणार नाही, असे सांगितले. पालकमंत्री चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी अनिल पाटील व अन्य उपस्थित अधिका-यांनीही हे सादरीकरण पाहिले.

* पुतळयाची जागा शासनाकडे हस्तांतरित :-

मंत्री केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्­या पुतळ्याची जागा राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता तेथे सार्वजनिक बांधकाम विभाग पुतळा उभारत आहे. यासाठी २० कोटी खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे; मात्र त्याचबरोबर येथे भव्य असा पर्यटन प्रकल्प व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. त्यामुळे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित तसेच शिवकालीन वास्तव दर्शवित असलेला प्रकल्प व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या