🌟शिवसेना (शिंदे) गटाकडून परभणीत धुमधडाक्यात रॅली काढून आनंद भरोसेंचा उमेदवारी अर्ज दाखल🌟
परभणी (दि.२८ आक्टोंबर २०२४) : परभणी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार आनंद भरोसे यांनी आज सोमवार दि.२८ आक्टोंबर रोजी शिवसेना (शिंदे) गटाकडून परभणीत धुमधडाक्यात रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.
भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष भरोसे यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेने (शिंदे) गटात प्रवेश केला पाठोपाठ शिवसेना श्रेष्ठींनी आनंद भरोसे यांना उमेदवारी बहाल केली. महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भरोसे यांनी रविवारी मध्यरात्री परभणीत दाखल होताच आज सोमवारी सकाळी जोरदार रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. येथील शनिवार बाजारातून सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी एका उघड्या जीपवर भरोसे यांच्यासह शिवसेनेचे नेते माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे,नेते प्रविण देशमुख,महानगरप्रमुख नितेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष भास्करराव लंगोटे, केशवराव कदम,माजी जिल्हाध्यक्ष राजू कापसे, महिला आघाडीच्या गीता सूर्यवंशी, माजी नगरसेवक शिवाजीराव भरोसे, कृष्णा भरोसे, राजू शिंदे,पंजाबराव देशमुख,सुरेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शंकरराव भागवत,भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे,भीमराव वायवळ,एन डी देशमुख, यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.
छत्रपती शिवाजी चौक, गुजरी बाजार, क्रांती चौक, गांधी पार्क, अष्टभूजा चौक, आर.आर. टॉवर, नारायण चाळ कॉर्नर मार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. यावेळी रॅलीतील उत्साही कार्यकर्त्यांनी बॅन्डच्या तालावर जोरदार नृत्य केले. तर ठिकठिकाणी फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतिषबाजी करण्यात आली. या रॅलीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील आंदोलन मैदानावर आयोजित केलेल्या सभेत शिवसेनेच्या अन्य वक्त्यांची जोरदार भाषणे झाली. कोणत्याही स्थितीत जागा निवडून आणू, असा विश्वास शिवसेनेच्या नेतेमंडळींनी व्यक्त केला.....
* भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींची गैर हजेरी :-
महायुतीतून भरोसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु, यावेळी काढलेल्या जोरदार रॅलीत भाजपच्या नेतेमंडळींची गैरहजेरी जाणवली. ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, डॉ. केदार खटींग यांच्यासह अन्य नेते गैरहजर होते. तर अन्य पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक हे जिंतूरला रवाना झाले होते. त्या ठिकाणी आमदार सौ. मेघना बोर्डीकर यांनी काढलेल्या रॅलीत ते सहभागी झाले होते......
0 टिप्पण्या