🌟विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पडावी याकरिता कलम 163 लागू🌟
परभणी :- महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी परभणी जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यामधील 95-जिंतूर, 96-परभणी, 97-गंगाखेड व 98-पाथरी या चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर, 2024 रोजी बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
त्याकरिता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यातील चारही मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदानाचे दिवशी मतदान केंद्राचे 200 मीटर परीसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता- 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सदरील आदेश मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजे दि. 18 नोव्हेंबर, 2024 च्या सायंकाळी 6.00 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर, 2024 च्या रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू राहतील असेही आदेशात नमूद आहे.
वरील कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहील. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारीक ओळख चिठ्ठया साध्या पांढ-या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रीत करण्यावर बंदी राहील. मतदान केंद्राचे 200 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांस बंदी राहील. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणुक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तीनांच प्रवेश राहील, या व्यतिरिक्त इतर व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल. मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण आणणे, मतदारांना धाकदपट दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राचे 200 मीटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहील.
उमेदवाराने मतदारांना मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याच्या प्रथेस पायबंद राहील. मतदानाच्या दिवशी ओळखचिठठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राचे परीसरात भिंतीपत्रके, ध्वज, चिन्ह आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी राहील. ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेल, अशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचा-यासह मतदार केंद्राचे 200 मीटर परीसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरीता सुरक्षा कर्मचा- यासह मतदार केंद्र परीसरात ये-जा करण्यावर निर्बंध राहील, तथापि विशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षा पथकास (Close Protection Team) शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्ती सोबत जाता येईल व एका वैयक्तिक सुरक्षा अधिका-यास शस्त्राचे प्रदर्शन न करता तसेच मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे अडथळा न करता संरक्षित व्यक्तीस (Protectee) मतदान केंद्रात सोबत करता येईल.
ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आलेली असेल किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीस निवडणूक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल, स्मार्टफोन, वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष, आचारसंहिता पथक, कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख / निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी याना उक्त प्रतिबंध लागू राहणार नाही.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करीता मतदान पथके मतदान केंद्रावर पोहचल्यानंतर मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये ध्वनीक्षेपकांच्या वापरावर पूर्णपणे निर्बंध राहतील तसेच मतदान केंद्राच्या 200 मीटर त्रिजेच्या परिसरात कोणत्याही सार्वजनिक वा खाजगी जागेमध्ये ध्वनीवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणा-या किंवा जो जसाच्या तसा ऐकविणारे उपकरण संच लावण्यास, वापरण्यास, चालविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
निर्बंधाच्या कालावधीत खालील बाबींवर बंदी असणार नाही. जिल्ह्यामधील सर्व विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचार दि. 18 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6 पासून बंद होत असला तरी, Door to Door प्रचारावर निर्बंधाचे कालावधीत प्रतिबंध असणार नाही, परंतू 05 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्या, अॅम्बुलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर्स, विदयुत विभाग / पोलीस / निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहीत मार्गाने जाणा-या बस गाड्यावर बंदी राहणार नाही. टॅक्सी बस स्थानक, रेल्वे स्टेशन हॉस्पीटल कडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग, आजारी व्यक्तीस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येणे करीता आजारी / दिव्यांग व्यक्तीचे वैयक्तीक वाहनास बंदी असणार नाही.
हा आदेश जिल्ह्यामधील समाविष्ट असलेल्या 95-जिंतूर, 96-परभणी, 97-गंगाखेड, व 98-पाथरी या एकूण 04 विधानसभा मतदारसंघा करिता दिनांक 18 नोव्हेंबर, 2024 चे सायंकाळी 6.00 वाजता पासून ते 20 नोव्हेंबर, 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत लागु राहील. हा आदेश सर्व निवडणूक कामकाजाशी संबंधित मतदानांशी संबंधीत अधिकारी, पोलीस अधिकारी, सुरक्षा पथकातील कर्मचारी, निवडणूक निरिक्षक यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय नागरिक सुरक्षा न्याय संहिता-2023 चे कलम 223 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेशात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या