परभणी/जितूर (दि.१३ नोव्हेंबर २०२४) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार मेघनाताई बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ जिंतूर येथे आयोजित जंगी सभेत बोलतांना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की वर्षानूवर्षापासून सत्ता भोगलेल्या व सत्तेकरीता अक्षरशः हापापलेल्या काँग्रेसजणांचा महाराष्ट्राच्या या निवडणूकीत २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुपडा साफ होणार आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
परभणी रस्त्यावरील साई मैदानावर केंद्रीय गृहमंत्री शाह यांची जिंतूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार तथा आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ बुधवारी दि.१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जंगी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, उमेदवार तथा आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, राष्ट्रवादीचे नेते प्रताप देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, गंगाधरराव बोर्डीकर, राधाजी शेळके यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी व्यासपीठावर विराजमान होती.
आपल्या भाषणातून केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांसह नेतृत्वावर कडाडून हल्ला केला. वर्षानूवर्षापासून सत्ता भोगलेल्या व आता सत्तेकरीता अक्षरशः हापापलेल्या काँग्रेसजणांनी लोकसभे पाठोपाठ हरियाणा व आता महाराष्ट्रातसुध्दा मोठ्या प्रमाणावर निगेटिव्हीटी, अपप्रचार सुरु केला आहे. त्याद्वारे सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेसजणांचे हे प्रयत्न हरियाणात अक्षरशः फोल ठरले. महाराष्ट्रातसुध्दा जागरुक मतदार काँग्रेसजणांचा निश्चितच सुपडा साफ करतील, असा विश्वास व्यक्त केला. काँगे्रसची ध्येय धोरणे, वाटचाल सदैव देशहिताविरोधात राहिली आहेत. जम्मूकाश्मिरच्या विधानसभेत 370 कलम पुन्हा बहाल करण्याचा ठराव मंजुर करीत काँग्रेसजणांनी देशविरोधी भूमिका बजावली आहे. परंतु, काँग्रेसजणांचे हे प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाहीत. राहुल बाबा तुमची चौथी पिढी ही आता 370 कलम पुन्हा लागू करु शकणार नाहीत, असे ठोसपणे सांगितले.
देशहिताच्या असो, विकास कामात काँग्रेसजणांनी सातत्याने स्विकारलेल्या भूमिका या संशयास्पद ठरल्या आहेत, असे नमूद करतेवेळी केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी देशाच्या आस्था, अस्मितेच्या प्रश्नावर काँग्रेसजणांनी केलेल्या विरोधाची उदाहरणे दिली. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीच्या प्रश्नावर हेतुतः विरोध केला. न्यायालयात खटला प्रलंबित रहावा यासाठी पराकाष्टा केली. अखेर न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर मोदी सरकारने जन्मभूमीत श्रीरामाची यथायोग्य प्राणप्रतिष्ठापना केली. त्यामुळे साडेपाचशे वर्षानंतर अयोध्येत या भव्य श्रीराम मंदिरात भक्तगणांना दिवाळीचा उत्सव साजरा करता आला. काशी विश्वनाथ कॅरिडोअरकरीता मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे त्या तीर्थक्षेत्रास भव्यदिव्य असे स्वरुप आले. आता सोमनाथ मंदिरसुध्दा सोन्याचे बनविले जात आहे, अशी माहिती दिली.
विकास कामातसुध्दा काँग्रेसजणांचे अडथळे महाराष्ट्रवासीयांनी दोन वर्षे अनुभवले आहे. मराठवाड्यातील 400 हजार कोटींची मराठवाडा ग्रीड योजना याच काँग्रेसजणांनी बासनात गुंडाळली. शेकडो विकास कामे केवळ द्वेषापोटी थांबवली. परंतु, आम्ही सत्तेत आल्या पाठोपाठ या योजना जलदगतीने पुढे नेल्या. आता पुन्हा सत्तेत आल्यानंतर या योजना प्रचंड वेगाने मार्गी लावू, असा विश्वास व्यक्त केला. जिंतूर तालुक्यातील पूर्णा नदीवरील येलदरीतील पुल असो, जिंतूर मतदारसंघांतर्गत महामार्ग असो, जिर्णोध्दाराची कामे असो जलदगतीने पूर्ण होत आहेत. सत्तेवर आल्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाकरीता प्राधिकरण स्थापन केले जाईल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक मिलीयन डॉलरपर्यंत पोहोचावी या दृष्टीने प्रयत्न केले जातील, सोयाबीन उत्पादकांच्या सोयाबीनला 6 हजार रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव दिला जाईल, संपूर्ण पीककर्ज माफ केले जाईल. शेतकर्यांचा सन्मान निधीसुध्दा 15 हजार रुपयांपर्यंत वाढविला जाईल, असे शहा यांनी आश्वासित केले.
* राहुल बाबांचे प्लेन पुन्हा क्रॅश होणार :-
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी स्वतःचे राजकीय वारसदार राहुल गांधी यांचे नेतृत्व, प्लेन लॅन्ड करण्याचा 20 वेळा प्रयत्न केला. दुर्देवाने तो प्रयत्न फोल ठरला. हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्राच्या निवडणूकीतही राहुल बाबांचे प्लेन लॅन्डींगचे प्रयत्न फोल ठरतील, असा दावा शहा यांनी केला....
0 टिप्पण्या