🌟परभणीत कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न....!


🌟भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य दादा लाड यांनी केले प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन🌟 

भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर व कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात व तामिळनाडु राज्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पा अंतर्गत दि. 9 नोव्हेंबर 2024 रोजी कृषि विज्ञान केंद्र, परभणीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे इटाळी ता. मानवत जि. परभणी येथे दादा लाड तंत्रज्ञानाने केलेल्या कापूस लागवड प्रक्षेत्रावर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय कार्यकारीणी सदस्य तथा प्रदेश संघटन मंत्री (महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात) दादा लाड उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रस्तावना करताना श्री. अमित तुपे, शास्त्रज्ञ तथा प्रकल्प समन्वयक विशेष कापुस प्रकल्प, कृषि विज्ञान केंद्र, परभणी यांनी या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातुन सघन कापुस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास व उत्पादन खर्च कमी होण्यात मदत होत असल्याचे प्रतिपादन केले. 

कार्यक्रमाच्या तांत्रिक सता्रमध्ये प्रमुख मार्गदर्शक दादा लाड यांनी सघन कापुस लागवड व दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली. कापसाच्या उत्पादन वाढी करता योग्य अंतर, गळ फांदी काढुन टाकणे, शेंडा खुडुन झाडांची उंची पारंपारीक पध्दतीपेक्षा कमी ठेवुन फळ फांदीला योग्य प्रकारे अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडाची संख्या व आकार वाढवुन उत्पादनात वाढ होईल या बद्दल मार्गदर्शन केले. 

तसेच या कार्यक्रमादरम्यान कापसाच्या पराट्यांची मशीन द्वारे कुट्टी करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यामुळे मजुरांच्या समस्येवर मात करुन पराट्यांची कुट्टी केल्यामुळे जमिनीच्या सेंद्रिय कर्बामध्ये वाढ होऊन त्याचा जमिनीला कश्या प्रकारे फायदा होत आहे याबाबत डॉ. उषा सातपुते, तांत्रिक प्रशिक्षक यांनी माहिती दिली. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, श्री. विशाल दलाल यांनी कृष विभागाच्या विविध योजना व स्मार्ट कॉटन प्रकल्पाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी मोजे. उक्कलगाव, मानवत, मंगरुळ व मानोली या गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. नामदेव काळे तर आभार प्रदर्शन श्री. कुंडलिक खुपसे यांनी केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या