🌟महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अनाचारांचे प्रायोजित धुमाकूळ पार पडले🌟
✍️संजय एम.देशमुख,निंबेकर (ज्येष्ठ पत्रकार) अकोला
☎️मोबा.क्र ९८८१३०४५४६
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
संविधानातून प्राप्त लोकशाहीतील अधिकार म्हणजे मतदात्या जनतेला समान न्याय,हक्क आणि पादर्शकतेचे संरक्षक उपहार असतात. ते राज्यकारभार तथा स्वायत्त संस्था आणि न्यायव्यवस्थेच्या विश्वासदर्शक वाटचालीतून जनतेला नेहमी मिळत रहावेत असे संविधानिक निकष आहेत.विश्वास ही मानवी जगतातील फार मोठी गोष्ट आहे.या चिरंतन सत्त्याच्या आधारावरच मानवी जीवनमुल्ल्यांचा सुलभ,शांततामय आणि आनंदी समाजव्यवस्थेचा डोलारा उभा आहे.मानवी समुहातील विश्वासाची नाती समाजामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात विराजमान असतांना राजकारण, प्रशासन आणि समाजकारणाच्या उच्च पातळीवर मात्र ती आज संशयाच्या प्रचंड चक्रव्युहात अडकलेली दिसत आहेत.हे लोकशाहीला लागलेले अनिष्ट ग्रहण आणि देशातील मतदारांना बसणारे आघात आहेत.
पारदर्शक,प्रामाणिक आणि नैतिक नीतिमुल्यांची वाटचाल करणाऱ्या समाजापुढे आज लोकशाहीला धक्के देणारे काही खोटे, गुन्हेगार, अनैतिक राजकारणी वावरत आहेत. आदर्श नावाच्या गोष्टी शिल्लक न ठेवल्याने समाजातही आता हा शिरकाव झिरपत आहे.त्यामुळे जसे लोकप्रतिनिधी निवडून आले तसे चालवा.लांड्या,लबाड्यांनी तयार होणारे शासन का असेना त्यांच्यासोबत राहून आपल्या तुंबड्या जेवढ्या भरता येतील तेवढ्या भरून घ्या.या अनैतिक प्रवाहाला बळ देणारी दादा-भाऊंची माणसं चौफेर निर्माण झाल्याने मतदारांच्या मतांचे अनादर होत आहेत. ती मते प्रसंगी पैशावर विकत घेणाऱ्या दलालांचा येथेच्छ सुळसुळाट झालेला आहे. देशातील विरोधी पक्ष संपवून स्वत:चीच मक्तेदारी निर्माण करण्याच्या अघोरी महत्वाकांक्षेने राजकारणी झपाटलेले आहेत. त्यामुळे लोकशाही संपवून गुलामगिरीकडे होणारी तर ही वाटचाल नाही ना? हे गडद संशय आता निर्माण झालेले आहेत. यावर आक्षेप घेणाऱ्या आणि बोलणारांना पराजित मानसिकतेचे नाव देऊन बेशरमपणे सगळं एकून घेण्याचे सध्याच्या येऊ घातलेल्या सत्ताधाऱ्यांचे मतलबी पावित्रे आहेत...!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील अनाचारांचे प्रायोजित धुमाकूळ पार पडले...पैशांच्या पाऊसात आपली प्रामाणिकता, आणि जीवनमुल्ल्ये गहाण ठेवणारे काही मतदार सुध्दा यामध्ये येथेच्छ भिजले. लोकशाही आणि समाजनिष्ठेशी बेईमानी करत काही राजकीय उमेदवारांचेच आम्ही वंशज म्हणून तृप्तीचे ढेकर देत उमेदवार नावाच्या यजमानांचे पाहूणचार घेण्याचा महोत्सव या महाराष्ट्रात साजरा झाला.त्या पाहूणचारात आपण विकाऊ आहोत,स्वस्तात विकले जात आहोत याचाही विसर अनेकांना पडलेला होता.नंतर प्रामाणिकता आणि अप्रामाणिकतेच्या सिमारेषांमध्ये मतदान झाले आणि निकाल लागले.जसे निकाल लागले तशी प्रचंड प्रमाणात संशयाची वादळं निर्माण झाली.कारण कामाने अगोदरच लोकप्रिय असणारे अभ्यासू पराजित झाले. काही सोम्या गोम्या वरपास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र अनपेक्षितपणे मेरिटचे गुण मिळावे असे आश्चर्यकारक आणि तेवढेच धक्कादायक निकाल होते. देशात आणि महाराष्ट्रासह काही राज्यात जसे परीक्षांचे घोळ झाले तसेच या विधानसभा निवडणुकांचे बाहेर आलेले निकाल आहेत,अशा शंका सर्वत्र निर्माण झाल्या आहेत.यामध्ये काही ईमान विकल्या गेलेल्या मतदारांची आणि त्यांच्यासोबत विक्रमी बेईमानी ईव्हीएम मधून घडल्याचे संशय अनेक तांत्रिक घटनांमधून समोर आलेले आहेत.फक्त पराजित उमेदवारच नाहीत,तर सर्वसामान्न्य प्रामाणिक मतदार सुध्दा आमच्या मतांचे एवढे अवमुल्यन का? म्हणून हताश झालेले आहेत.परंतू कोणत्याही अटी तटीच्या प्रसंगांमध्ये फक्त नेत्यांचेच आवाज पुढे दिसतात आणि सर्वसामान्न्यांचे मात्र मिडीयाच्या पटलावर पोहचू शकत नसतात.
देशातील स्वायत्त संस्था,निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांचे किती हस्तक्षेप आणि प्रचंड अनाचार चालू आहेत हे देशातील जनतेला उघड्या डोळ्यांनी पहावं लागत आहे.बधीर कानांनी नाईलाजाने ऐकावे लागत आहे.मग आपल्या देशात नैतिक मुल्यांसोबतच संविधान आणि लोकशाही आज नावापुरतीच शिल्लक आहे का? हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याची समर्पक उत्तरे मात्र राजकीय नेते,स्वायत्त संस्था आणि एक संरक्षक आधार म्हणून ज्यांना मानलं जातं ती न्यायव्यवस्था सुध्दा आज देऊ शकत नाही. चिंतनशील माणसं अंतर्मुख झाली आहेत...शांत झाली आहेत...!एवढी ही पराधिनता म्हणजे लोकशाहीची जबर मारेकरी समोर दत्तपणे उभी आहे.ती लोकांना जगूही देत नाही आणि मरू पण देत नाही.भारतातील नेत्यांनी निवडणुकांमध्ये कोट्यावधी रूपये उथळले,ते जगाने पाहिले आणि न्यायव्यस्थेला मात्र दिसले नाहीत.लोकशाहीप्रधान देशात लोकशाहीची कशी विटंबना चालू आहे याच्या बातम्या अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी सुध्दा दाखविल्याचे वृत्त आहे. तरीही खोट्या पदव्यांप्रमाणेच विश्व गुरूपदाचेही कोरडे डंके वाजवतांना कोणताही कमीपणा वाटू नये,या निगरगठ्ठपणाला काय म्हणावे ?
महाराष्ट्रातल्या विधानसभेचे निकाल एवढे धक्कादायक लागावे की गैरव्यवहारांवर अंकुश ठेवणारा लोकशाहीतील विरोधी पक्षही शिल्लक राहू नये? एवढे या राज्यातील महायुतीचे नेते लोकप्रिय झालेले आहेत का? ज्यांना ६ महिण्यापूर्वीच लोकसभेत मतदारांनी नाकारलं त्यांच्याप्रतीच त्यांचे एवढे अचानक प्रेम वाढले काय? आपला पक्ष फोडला म्हणून या मतलबी फितुरांविरोधात जनतेमधून मिळालेली सहानभुती एकदम कशी काय कमी झाली? अजित पवार आश्चर्यकारक यशाने आणि एकनाथ शिंदे विक्रमी विजेत्या उमेदवारांसह कसे काय पुढे आले? बरं मिळालेला विजय हा (अ) प्रामाणिकतापूर्ण यशाच्या प्रमाणात संपूर्ण जल्लोषासह उचित आनंदाने व्यक्त का झाला नाही? सगळा आनंदी आनंद दुथडी भरून वाहत होता,दुखवटा वगैरे तर नव्हताच.मग त्या आनंदाचा महापूर का दिसला नाही? याबाबत लबाडांच्या उलटतपासण्या करणाऱ्या मतदारांच्या अंतर्मनामधील संशयाचे तर्कवितर्क शब्दातून बाहेर येत आहेत. लोकशाहीला संपवू पाहणाऱ्या संभाव्य धोक्यांचे उठणारे तरंग प्रतिक्रियांमधून समोर येत आहेत.मग मिळालेला विजय हा मतदानाचाच होता की ईव्हीएम यंत्रणेमध्ये सुध्दा अनाचार, बेईमानी,लबाडी करावी लागली याचे सत्य निष्कर्ष तर समोर आलेच पाहिजेत.याशिवाय निर्माण झालेली वादळं शमणार नाहीत.
देशातील मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर जर घेतल्या गेलं तर सर्व तांत्रिक संशयांना पूर्णविराम मिळेल.अनेक प्रगत आणि मोठ्या देशांमध्ये बॅलेटवर मतदान आहे.ईथेही तसेच करून कोण किती लोकप्रिय याच्या सत्यता समोर आल्या पाहिजेत.भारतातील जनतेकडून जर तशीच मागणी पुढे येत आहे,तर त्याचा विचार झालाच पाहिजे. ह्या जनभावना लक्षात घेऊन ईव्हीएम योग्य की अयोग्य यावर युक्तीवाद करण्यापेक्षा आणि न्यायव्यवस्थेने नेत्यांना "पराजित झालात म्हणून संशय घेत आहात" म्हणण्यापेक्षा देशातील मतदात्यांकडून हा कौल घेतला पाहिजे. "ईव्हीएम की बॕलेट" यावरच ठशाचे मतदान घेत हा विषय समजून घेऊन मतदारांच्या मागण्यांचा आदर झाला पाहिजे.न्यायव्यवस्था ही फक्त नेत्यांसाठी नाही,तर जनसामान्न्यांना न्याय देऊन त्यांच्या आक्रोशांना थांबवण्यासाठी आहे,या भुमिकेतून न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा आणि आदर अबाधित राखला जावा.
ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांमध्ये अनेक ठीकाणी प्रचंड तफावत आढळलेली आहे.काही गावांमध्ये मतसंख्या कमी आणि सर्व उमेदवारांना मिळालेली मतांची बेरीज मात्र त्याहून दुप्पट,तिप्पट.....काही मशिनमध्ये एकाच चिन्हांवर जाणारी मते तर गेली......नंतर तक्रार झाल्यावर अधिकाऱ्याने मामूली बटन दाबून ती दुरूस्त करावी. असे मनोरंजक आणि संशयास्पद प्रकार असंख्य घडलेले आहेत.तरीही न्यायाव्यवस्थेने ईव्हीएम ची पाठराखण करून याचिकाकर्त्यांना धुडकावून लावावे हे योग्य वाटत नाही.निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर आम्हाला कुठे दिसलाच नाही म्हणावे, म्हणजे देशातील मतदारांची निराशा करून त्यांना नाउमेद करण्यासारखे आहे.
जागोजागी सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाची, अधिकारांच्या गैरवापराची तथा लोकशाही आणि संविधानाप्रतीच्या प्रतारणेची व निवडणुकांमधील गैरप्रकारांची उदाहरणे गेल्या दहा वर्षापासून गाजत आहेत.परंतू महाराष्ट्र विधानसभेच्या निकालांनी सर्वांना आश्चर्यचकित केल्याने हा प्रश्न आणखी ऐरणीवर आलेला आहे.ईव्हिएम मतांच्या फेरतपासण्यांसाठी प्रती ईव्हीएम १८ टक्के जीएसटीसह रू.४७ हजार २०० एवढे प्रचंड शुल्क ठेवल्याने पाण्यासारखा पैसा खर्च करून पराभूत झालेल्या उमेदवारांना त्या हक्कांपासूनही वंचित ठेवता यावे एवढी ही शकुनी व्यूव्हरचना आहे.या निकालांनी राज्यातील प्रामाणिक मतदार निराश झाले असून त्यामुळे "ईव्हीएम हटाव और फिरसे बॕलेटपेपर चलाव" या मागणीची आंदोलने आता जोर धरणार आहेत.त्याला "भारत जोडो" प्रमाणे व्यापक प्रमाणात राबवू असे कॉंग्रेसने बजावले आहे.मित्रपक्ष सुध्दा यात सहभागी आहेत.महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुध्दा न्यायालयात जाणार असून काही मतदार सुध्दा आता याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.सध्या झालेल्या निवडणुका रद्द करून परत बॕलेट पेपरवर घ्याव्यात अशाही मागण्या आंदोलनासोबत राहणार आहेत.या संविधानिक राज्यघटनेतील लोकशाहीला अबाधित ठेऊन हुकूमशाहीला थोपवायचे असेल तर हे जनआंदोलन राजसत्तेला उलथवून टाकणारे देशातील एक महाकाय वादळ ठरले पाहिजे.देशनिष्ठा,समाजनिष्ठा जागवून लोकशाहीला संपवू पाहणाऱ्या अनैतिक शक्तीविरूध्द एकत्र येणे हे संवेदनशील तरुणांचे,मतदारांचे मोठे कर्तव्य ठरणार आहे. खोट्यांविरूध्द प्रामाणिक लोकांचा हा लढा राहणार आहे.तो तिव्र झाला पाहिजे....वादळी ठरला पाहिजे.त्याच वादळाने देशातील अनाचार आणि हिटलरशाहीचे वृक्ष उन्मळून पडले पाहिजेत....! काळ बिकट आहे उथळलेला कोट्यावधीचा घामाचा पेसा आता जनतेच्या खिशातून प्रचंड महागाई,करवसुली आणि नानाविध मार्गांनी वसूल होणार आहे. आता काळ बिकट आहे....त्यासाठीच उठा...जागे व्हा...!! सावध व्हा !!!
============================
0 टिप्पण्या