🌟मतदात्यांनी महाराष्ट्राची सत्ता गद्दारांऐवजी निष्ठावानांच्या हातात सत्ता सोपवावी असे आवाहनही उध्दव ठाकरे यांनी केले🌟
परभणी (दि.०९ नोव्हेंबर २०२४) : महाराष्ट्र राज्यासह तुमच्या-आमच्याउ भवितव्या करीता सर्वसामान्य मतदारांनी मशाल पेटवून भ्रष्ट महायुती सरकारचा कारभार जाळावा अन् गद्दारांऐवजी निष्ठावानांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता सोपवावी असे आवाहन शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी परभणीतील प्रचंड जाहीर सभेतून केले परभणी शहरातील जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर आज शनिवार दि.०९ नोव्हेंबर रोजी रात्री शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राहुल पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेप्रसंगी पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते.
यावेळी खासदार संजय उर्फ बंडू जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार श्रीमती फौजिया खान, कॉंग्रेस पक्षाचे आमदार सुरेश वरपुडकर,माजी आमदार सुरेशदादा देशमुख,माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, माजी आमदार सौ. मिरा रेंगे, माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा उमेदवार विशाल कदम, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे, अजयराव गव्हाणे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते.
आपल्या भाषणातून ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसह महायुतीच्या वाटचालीसह धोरणांवर जोरदार टिका टिप्पणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे दोघे सीमेवर चीनने पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न चालविले असतांना, मणिपूर सारख्या संवेदनशील राज्यात दिवसा ढवळ्या पुन्हा एकदा एका महिलेवर सामुदायिकपणे अन्याय, अत्याचाराची घटना घडली असतांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत दौरे करीत कमालीचे स्वारस्य दाखवू लागले आहेत. त्यातूनच या दोघांचा असंवेदनशीलपणा, निष्क्रियताच प्रकर्षाने दिसून येत आहे. त्याचे कारणच मोदी असो, शाह यांना कोणत्याही स्थितीत मनमानी कारभार करण्याकरीता मुंबई असो, महाराष्ट्र हवा आहे. महाराष्ट्र म्हणजे नोटा छापण्याचे यंत्र, असा गृह या दोघांचा आहे. गुजरातला सगळं काही नेवू, असाच व्ह्यूव या दोघांसह भाजपाचा राहिला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य मतदारांनी दूरदृष्टीतील वाटचाल ओळखून या दोघांसह भाजपास महाराष्ट्राबाहेर हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले. आज मुंबई अदानींच्या घशात टाकली जात आहे. अदानींना मोठ्या प्रमाणावर सोयी, सवलती सुविधा दिल्या जात आहेत. आघाडी सरकार सत्तेवर आल्याबरोबर निश्चितपणे अदानींना मुंबईबाहेर काढू, सुविधा-सवलती काढून घेवू, मराठी माणसालाच हक्काचे, सवलतीत घर उपलब्ध करुन देवी, अशी ग्वाही ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिली. मी तुमच्यासाठी लढतो, मी महाराष्ट्रासाठी लढतोय, महाराष्ट्र तुटू देणार नाही, कोणासमोर झुकणारसुध्दा नाही, केवळ तुमच्या बळावरच आपण लढतो आहोत, असे नमूद करतेवेळी ठाकरे कुटूंबियांना कोणीही संपवू शकत नाही. 40 डोकी फोडली परंतु 40 लोकं ठाकरे कुटूंबियांशी जोडल्या गेली, असे ते म्हणाले. उध्दव बाळासाहेब ठाकरे या नावालाच आज मोठी किंमत आहे. घराणेशाहीचा आरोप होतोय, परंतु प्रबोधनकार असो किंवा बाळासाहेब यांचा समृध्द वारशाचा आपणास अभिमान आहे. तीच आपली संपत्ती आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.
सर्वसामान्य मतदारांनी महायुतीचे हे भ्रष्ट सरकार मशाल पेटवून जाळून टाकावे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून समर्थ असे सरकार सत्तेवर आणावे, असे आवाहन करतेवेळी ठाकरे यांनी सर्वसामान्य शेतकर्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमुक्त करु, लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावाससुध्दा रोजगार मिळेपर्यंत 4 हजार रुपये प्रतिमहा देवू, पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव निश्चितपणे स्थिर ठेवू, असे आश्वासन दिले. लाडकी बहिण योजना असो की कर्जमुक्तीचा निर्णय म्हणजे काय उपकार नाहीत, ते कर्तव्य आहे, असा टोला लगावून ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या कारकिर्दीतील काळे उद्योग निर्लज्जपणाचा कळस आहे, असे नमूद केले. पूल कोसळणं, छत गळणं, संसद असो राममंदिरसुध्दा गळणं, महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं म्हणजे निव्वळ महाराष्ट्राच्या थट्टेचा हा प्रकार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.
परभणी म्हणजे माझे होम पिच आहे, इथं येणं एक मजा आहे. तुम्ही आहातच तसे, असे नमूद करतेवेळी गद्दारी झाली परंतु, आमदार पाटील असो, खासदार जाधव व परभणी जिल्हावासीयांनी गद्दारीचा तो किडा गडाला लागू दिला नाही. लोकसभेतून प्रचंड मताधिक्याने विजय दिला आता विधानसभा निवडणूकीतसुध्दा तेवढ्याच मताधिक्याने चारही उमेदवार निवडणून द्या, असे आवाहन करतेवेळी या निवडणूका महत्वपूर्ण आहेत. आता जर यश आले नाही तर महाराष्ट्र हातातून गेलाच समजा, असे ते म्हणाले.....
0 टिप्पण्या