🌟भारतीय संविधान हा भारतीयांचा धर्मग्रंथ - लोकनेते विजय वाकोडे


🌟परभणीत ‘आम्ही तुम्ही सर्वजण’ या बॅनरखाली भव्य प्रमाणात संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी ते म्हणाले🌟 

परभणी (दि.२९ नोव्हेंबर २०२४) : विविध धर्मांना, भाषा, प्रांत अनेक संस्कृतींना तसेच देशातील साडेसहा हजार जातींना एकत्र जोडण्याचे काम भारतीय संविधानाने केले असून खर्‍या अर्थाने भारतीय संविधान हे भारतीयांचा धर्मग्रंच आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी केले.

           शुक्रवार 29 नोव्हेंबर रोजी शनिवार बाजार येथून सकाळी 10 वाजता ‘आम्ही तुम्ही सर्वजण’ या बॅनरखाली भव्य प्रमाणात संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एका लहान मुलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा साकारली होती. त्यासोबत संविधानाची प्रत आणि लेखणी प्रतीरुपी ठेवण्यात आली होती. रॅलीमध्ये अनेकांच्या हातात संविधान जागृतीचे विविध घोषणा फलक ही देण्यात आले होते.  भारतीय संविधानाच्या जयघोष करत ही रॅली शनिवार बाजार येथून पुढे शिवाजी चौक मार्गे गांधी पार्क, आर आर टावर, स्टेशन रोड मार्गे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळ्याला अभिवादन करत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन स्टेशन रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये बँड पथकावर भारत मातेचे गीत, महाराष्ट्र गीत आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.  या पुतळा परिसरात रॅली आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भव्य पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सामूहिक संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.

           डॉ. भारत नांदुरे यांच्या वतीने स्वखर्चातून मोफत 50 हजार संविधान वाटपाचे नियोजन करण्यात आले. रॅली दरम्यान विविध दुकानांवर अनेक लोकांना संविधान पुस्तिका वाटप करण्यात आली. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या मुलींचा जास्त प्रमाणात सहभाग होता. त्यासोबत शेकडो विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ही रॅली यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे प्राध्यापक विठ्ठल कांगणे, सुधीर साळवे ,लखन जामकर, आशिष वाकोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

📖 घराघरात संविधान पोहोचवण्यासाठी प्रयत्न :-

            परभणी जिल्हा हा विविध चळवळीचा केंद्र आहे. या संविधान रॅलीच्या माध्यमातून ही संविधान चळवळ संपूर्ण देशभरात राबविण्याचा आमचा मानस आहे. आजच्या तरुणांच्या हातात देशाचे भवितव्य आहे, हे भवितव्य घडवायचे असेल तर प्रत्येकाच्या घराघरात संविधान पोहोचण्याची जबाबदारी या चळवळीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत, असे  या रॅलीचे समन्वयक प्रा. विठ्ठल कांगणे यांनी यावेळी संबोधित करताना म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या